कपाशीची शेती ठरतेय तोट्याची
By Admin | Updated: November 29, 2014 01:59 IST2014-11-29T01:59:11+5:302014-11-29T01:59:11+5:30
‘कापूस म्हणजे समृद्धी’ असे समीकरण झालेल्या आर्वीची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती़ हे..

कपाशीची शेती ठरतेय तोट्याची
पिंपळखुटा : ‘कापूस म्हणजे समृद्धी’ असे समीकरण झालेल्या आर्वीची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती़ हे वैभव अनुभवलेल्या तालुक्यावर आता क्विंटलने नव्हे तर किलोने कापूस मोजण्याची वेळ आली आहे़ लहरी निसर्ग व बी-बियाणे, खतांचे वाढते दर, मजुरांची टंचाई यामुळे कापसाची शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय, असा समज रूढ झाला आहे. यंदा कापूस व सोयाबीनने शेतकऱ्यांना पूर्णत: उद्ध्वस्त केले आहे़
शेती अन् शेतकरी, हा आता थट्टेचा विषय झाला आहे. निसर्ग आणि सातबारा कोरा करू पाहणाऱ्या निगरगट्ट शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करीत आहे. नापिकीतून कर्जाचा डोंगर वाढत गेला की शेतकरी कापसाचा गळफास करतो. यंदाही निसर्गाने अशीच स्थिती करून ठेवली आहे. अनेक समस्या सहन करून कापूस आता घरात येऊ लागला तर हमीभावाचे भीजत घोंगडे कायम आहे़ शासनाने ४०५० रुपये भाव घोषित केला; पण पणनची खरेदी ठराविक ठिकाणी असल्याने खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट होत आहे. अग्रीम बोनस शासन कुणाला देणार, हे स्पष्ट होत आहे. खेडा खरेदीत वजन करण्याचे मोजमाप नाही. भावात गय नाही, अशाप्रकारे शेतकऱ्यांची लुटच होत आहे. यंदा सोयाबीनचा उतारा घटला आणि कपाशीलाही एकरी विशेष उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे़(वार्ताहर)