सेलू तालुक्यातील कापूस आर्वी बाजारात
By Admin | Updated: April 16, 2016 01:34 IST2016-04-16T01:34:53+5:302016-04-16T01:34:53+5:30
चालू आर्थिक वर्षात पांढऱ्या सोन्याच्या भावात मंदीचे सावट असल्याचे दिसते. यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीमध्ये नुकसान सोसावे लागत असल्याचे दिसते.

सेलू तालुक्यातील कापूस आर्वी बाजारात
फसवणुकीचे प्रकार : दोनच जिनिंगमध्ये खरेदी
झडशी : चालू आर्थिक वर्षात पांढऱ्या सोन्याच्या भावात मंदीचे सावट असल्याचे दिसते. यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीमध्ये नुकसान सोसावे लागत असल्याचे दिसते. परिणामी, अधिक भाव व नगदी चुकाऱ्यासाठी सेलू तालुक्यातील कापूस आर्वीच्या बाजारपेठेत जात असल्याचे दिसते.
काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात सेलूची बाजारपेठ कापसाकरिता वरदान ठरत होती. या बाजारपेठेत नागपूर व इतर काही जिल्ह्यातील कापूस विक्रीस येत होता. शिवाय लांब धाग्याचा कापूस उत्पादन करणारा तालुका म्हणून सेलू तालुक्याची वेगळी ओळख होती. यावर्षी सुरवातीपासूनच बहुतांश शेतकऱ्यांनी आर्वीच्या बाजारपेठेला पहिली पसंती दिली. आर्वी आणि सेलूच्या बाजारपेठेतील कापूस दरामध्ये १०० ते २०० रुपयांचा फरक असतो. शिवाय सेलू बाजारपेठेत कापूस उधारीवर खरेदी केला जातो. नगदी चुकारे पाहिजे असल्यास तर काही टक्के कपात केली जाते. सेलू बाजारपेठेत पिळवणूक होत असल्याने शेतकरी आर्वी तालुक्यात कापूस विकताना दिसतात. गतवर्षीपेक्षा यंदा कापसाचा पेरा वाढला. उत्पन्नातही वाढ झाली; पण सेलूच्या बाजारपेठेत विशेष कापूस आला नाही. सेलू येथे तीन जिनिंगमध्ये खरेदी सुरू आहे; पण टालाटुले यांनी आठ कोटींचे चुकारे थकविले. यामुळे दोन जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. लिलाव पद्धत नावापूरती राहिली आहे. यामुळे सेलूची बाजार कमकुवत होताना दिसते. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर गांभीर्याने विचार करून तालुक्यातच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)