कोतवालांचे कामबंद आंदोलन
By Admin | Updated: December 9, 2015 02:29 IST2015-12-09T02:29:27+5:302015-12-09T02:29:27+5:30
राज्य कोतवाल संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.

कोतवालांचे कामबंद आंदोलन
तहसीलदारांना निवेदन : श्रेणीअभावी अनेक अडचणी
वर्धा: राज्य कोतवाल संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात वर्धा तालुक्यातील कोतवालांनीही सहभागी होत कामबंद केले आहे. याबाबत तहसीलदार राहुल सारंग यांना मंगळवारी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
कोतवालांना शासनाकडून नियुक्ती दिली जाते; पण त्यांना कुठलीही श्रेणी दिली जात नाही. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंद तयार करण्यात आला आहे. यात वर्ग एक ते चारचा समावेश असतो; पण कोतवालांना कुठलीही श्रेणी लागू करण्यात आलेली नाही. यामुळे त्यांना महागाई तसेच अन्य भत्ते व शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
ही मुख्य समस्या मार्गी लागावी व कर्मचारी म्हणून शासकीय लाभ प्राप्त व्हावेत यासाठी कोतवाल संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वर्धा तालुक्यातील कोतवालांनीही या आंदोलनात सहभागी होऊन कामबंद केले आहे. शिवाय १४ डिसेंबर रोजी वर्धा ते नागपूर, अशी पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे निवदेनात उल्लेखित आहे. हिवाळी अधिवेशनात तरी कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून स्थान मिळावे, अशी मागणी कोतवालांची आहे. याबाबत तहसीलदार सारंग यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी लोचन गुरनूले, प्रवीण मेश्राम, सतीश उघडे, प्रशांत नाखले, स्वराज जितुले, बंडू सागर, हर्षल बगेकर, रमेश ताजने, अमोल उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)