दगदगीतून आरामासाठी ट्रॅक्टरवरच बांधली ‘खाट’

By Admin | Updated: December 9, 2015 02:36 IST2015-12-09T02:36:30+5:302015-12-09T02:36:30+5:30

वाहन चालकाने मुक्कामाच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच थकलेल्या शरीराला विसावा मिळावा म्हणून वाहनावरच शयनकक्ष थाटले.

'Cot' built on tractor for comfort | दगदगीतून आरामासाठी ट्रॅक्टरवरच बांधली ‘खाट’

दगदगीतून आरामासाठी ट्रॅक्टरवरच बांधली ‘खाट’

वाहन चालकांची नामी शक्कल : ऊस तोडणी ते कारखान्यात पोहोचेपर्यंतची वेळ घालविण्यासाठी कसरत
प्रफूल्ल लुंगे सेलू
वाहन चालकाने मुक्कामाच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच थकलेल्या शरीराला विसावा मिळावा म्हणून वाहनावरच शयनकक्ष थाटले. हे चित्र ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सध्या पाहायला मिळत आहे. छताची व्यवस्था नसलेल्या ट्रॅक्टरवर ही किमया साधण्याची कला सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. हे शयनकक्ष हुबेहुब झोपाळ्यासारखे दिसत असल्याने ‘ट्रॅक्टरकम शयनयान’ हा फॉम्यूला जवळपास सर्वच ट्रॅक्टर वाहनचालक तयार करून घेताना दिसतात.
सध्या ऊस कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. कापलेला ऊस ट्रॅक्टरच्या साह्याने कारखान्यापर्यंत पोहोचविला जात आहे. दिवसभर मजुरांकडून ऊसाची तोडणी केली जाते. सायंकाळच्या सुमारास भरलेली ऊसगाडी कारखान्यात पोहोचविली जाते. तेथे नंबर लावल्यानंतर वाहन चालकाला वाहन सोडून जाता येत नाही. यामुळे वाहनाशेजारीच अंथरून टाकून विश्रांती करावी लागते. किमान चार ते पाच तासानंतर नंबर लागतो. यानंतर गाडी आत घेण्यात येते. तेथे गाडी रिकामी करेपर्यंत दोन ते तीन तास थांबावे लागते. या वेळेत विश्रांतीसाठी वाहन चालकाला रात्रीच्या सुमारास वाहनावरच अवलंबून राहावे लागते. यातूनच वाहन चालकांनी ही नामी शक्कल शोधून काढली आहे.
एरवी रेल्वेत झोपण्याची व्यवस्था असते. स्लीपर कोच, व्हाल्वोमध्ये सुद्धा ही सोय उपलब्ध असते. चारचाकी छत असलेल्या वाहनांत मुक्कामाच्या ठिकाणी चालकाला विश्रांतीसाठी सीटचा आधार असतो; पण छताची व्यवस्था नसलेल्या ट्रॅक्टरवर शयनकक्षाची किमया चालकांनी साधली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी थकलेल्या शरीराला आरामासाठी ट्रॅक्टरवरच खाट तयार केली आहे.

तब्बल आठ तासांची असते प्रतीक्षा
ऊस तोडणी कामगारांकडून ऊसाची तोड केली जाते. यानंतर तो ऊस वाहनांमध्ये भरला जातो. ही वाहने मग कारखान्याची वाट धरतात. एकाच वेळी असंख्य वाहने कारखान्याकडे जात असल्याने तेथेही नंबर लावावा लागतो. एका वाहनाला नंबर येईपर्यंत तब्बल चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागते. शिवाय वाहन कारखान्यात घेतल्यानंतरही दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते. या आठ तासांच्या प्रतीक्षेत क्षीणलेल्या शरिराला आराम देण्याकरिता ट्रॅक्टरच्या चालकांनी ही नामी शक्कल लढविली आहे.
छत नसलेल्या ट्रॅक्टरमध्ये खाट बांधून झोपाळ्यासारखी सोय करण्यात आली आहे. यामुळे ऊस तोडणीच्या ट्रॅक्टरला शयनकक्षाचे स्वरूप आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका वाहन चालकाने केलेली ही युक्ती ऊस तोडणीवर असलेल्या अन्य ट्रॅक्टर चालकांनीही आत्मसात केली आहे. आता तालुक्यात दाखल झालेल्या प्रत्येक ट्रॅक्टरवर खाट बांधली जात असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. या युक्तीमुळे सततच्या कामांतून मिळणाऱ्या वेळेत चालक व मजुरांना आराम करता येत असल्याचे दिसते.

Web Title: 'Cot' built on tractor for comfort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.