चवथीच्या एका दाखल्याची किंमत दोन हजार रुपये

By Admin | Updated: May 17, 2014 23:48 IST2014-05-17T23:48:35+5:302014-05-17T23:48:35+5:30

शिक्षण क्षेत्रावर एवढे वाईट दिवस येतील, याचा विचार कुणीही केला नसावा. पूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपूरी पडत होती;

The cost of a fourth one is Rs. 2 thousand | चवथीच्या एका दाखल्याची किंमत दोन हजार रुपये

चवथीच्या एका दाखल्याची किंमत दोन हजार रुपये

विरुळ (आकाजी) : शिक्षण क्षेत्रावर एवढे वाईट दिवस येतील, याचा विचार कुणीही केला नसावा. पूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपूरी पडत होती; पण आता विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पालकांना विविध प्रलोभने दिली जात असल्याचे दिसते. परिसरातील गावांत चवथीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची किंमत दोन हजार रुपये लावली जात आहे. इयत्ता चवथी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आपल्याच शाळेत कसा येईल, आपल्या शाळेच्या तुकड्या कशा वाचतील, यासाठी चक्क काही पालकांना पैशाचे आमिष दाखविले जात आहे. विद्यार्थ्यांचे दाखले घेण्यासाठी महागडी स्पर्धा शिक्षकांना करावी लागत आहे़ एका दाखल्यासाठी दोन-दोन हजार रुपये मोजावे लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ यातही काही पालक अपवाद ठरत आहेत. ते कुणाच्याही पैशाला हात लावत नाही, कुणाकडून पैसे घेत नाही व आपल्या मुलांना शाळेत पाठवितात. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने व इंग्रजी शाळेचे भरघोस पीक आल्याने ग्रामीण भागातील शाळांवर ही वेळ आली आहे़ नुकताच चवथीचा निकाल जाहीर झाला. चवथी पास झालेले विद्यार्थी पाचवीत प्रवेश करण्यासाठी आपल्या शाळेत कसे दाखल होतील व आपल्या तुकड्या कशा वाचतील, या विचारात असलेले संस्थाचालक आता शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी शोधमोहिम चालवित आहेत. अंगाची काहिली करणार्‍या उन्हाची पर्वा न करता अनेक शिक्षक फिरताना दिसत आहे़ ज्या गावात दोन - दोन हायस्कूल आहे, त्या गावातील शिक्षकांत विद्यार्थी आपल्याच शाळेत कसा येतील, याची स्पर्धा लागल्याचे दिसते. पालक चांगल्या शाळेच्या शोधात दिसतात. एक-दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातच एकापेक्षा अधिक शाळा असल्याने विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे़ शिक्षणाचा दर्जा पाहूनच पालकांची शाळांना पसंती देण्याची भूमिका पाहता काही शाळा यंदा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीवाचा आटापिटा करूनही विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा चालकांची झोप उडाली आहे़ यामुळे बोगस विद्यार्थीही हजेरी पटावर दाखविण्याची भीती व्यक्त होत आहे़ शिक्षण विभागाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.(वार्ताहर)

Web Title: The cost of a fourth one is Rs. 2 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.