हिंगणघाट येथे अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार
By Admin | Updated: August 1, 2016 00:30 IST2016-08-01T00:30:53+5:302016-08-01T00:30:53+5:30
एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाद्वारे हिंगणघाट नगर परिषदेला अंगणवाडी बांधकामासाठी निधी आला.

हिंगणघाट येथे अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार
नगरसेविकेचा पत्रपरिषदेत आरोप : चौकशीकडे दुर्लक्ष झाल्यास पोलिसात तक्रार करणार
हिंगणघाट : एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाद्वारे हिंगणघाट नगर परिषदेला अंगणवाडी बांधकामासाठी निधी आला. या निधीत ५२ अंगणवाडींचे बांधकाम करावयाचे होते. असे असताना केवळ २८ अंगणवाडीचे बांधकाम झाले आहे. शिवाय झालेले बांधकाम सदोषपूर्ण असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेविका शुभांगी डोंगरे यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेतून केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत हिंगणघाट नगर परिषदेला ५२ अंगणवाडींच्या बांधकामाकरिता १ कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. न.प.च्या बांधकाम विभागाचे अभियंता विश्वनाथ माळवे यांनी या अंगणवाडी बांधकामाच्या आदेशात स्वत:च्या मर्जीने बदल करून केवळ ५० पैकी ४२ अंगणवाडीला मंजुरी दिली. शहरातील विविध प्रभागात यापैकी केवळ २८ अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. या काही अपूर्ण व काही पूर्ण झालेल्या बांधकामांना भेटी दिल्या असता सदर बांधकामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आले. सर्वच अंगणवाडीच्या छताला गळती लागली आहे. काही स्वयंपाकाचा ओटा, जमीनदोस्त झालेला आहे. तर काही अंगणवाडीची दारे तुटलेली आहेत.
नव्याने बांधलेल्या अंगणवाडीच्या इमारतींची केवळ सात महिन्यात दैनावस्था झाली आहे. यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेविका डोंगरे यांनी केला आहे. ४५० चौरस फुट जागेवरील एक अंगणवाडी बांधकामासाठी ४.५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तरीही हे काम निर्धारित रकमेपेक्षा १७.५० टक्के अधिक दराने देण्यात आले.
नगराध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश
या प्रकरणी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्याधिकारी जगताप यांनी २ आॅगस्टपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी दिलेल्या कालावधीत कार्यवाही न केल्यास स्वत: अभियंता माळवे व संबंधित कंत्राटदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याचे शुभांगी डोंगरे यांनी यावेळी सांगितले. ३० जुलैला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडला. त्यावर २० मिनिटे चर्चा झाली असून नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही डोंगरे यांनी यावेळी सांगितले.