Coronation liberation double century completed | कोरोनामुक्तीचे द्विशतक पूर्ण

कोरोनामुक्तीचे द्विशतक पूर्ण

ठळक मुद्देएकाच दिवशी आढळले १३ रुग्ण : २१५ व्यक्तींचे अहवाल प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बुधवारी १३ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी १६ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २१२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे.
बुधवारी एकूण २१५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यापैकी १३ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड केअर सेंटरमधून २१८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. शिवाय २३७ संशयीत व्यक्तीच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ९ हजार ४०३ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १५९ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे. तर सध्या २९२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर तसेच विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सावंगीच्या रुग्णालयाचे शतक पूर्ण
वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात भरती होऊन व उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. सावंगी मेघे रुग्णालयातून बुधवारी पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात बुटीबोरी, पुलगाव, बोरगाव व वर्धा येथील रुग्णांसह निमगाव (सबाने) येथील ७५ वर्षीय रुग्णालाही सुदृढ आरोग्याची सदिच्छा देत निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल शिंदे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, नर्सिंग संचालक सिस्टर टेसी सबास्टीयन, अधिपरिचारिका माधुरी ढोरे, कोविड वॉर्ड इंचार्ज विशाखा हिवरकर, मुख्य वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अजय ठाकरे, सुशांत वानखेडे तसेच डॉक्टर व परिचारिकांची उपस्थिती होती. सध्या २८ कोरोनाबाधित व्यक्ती सावंगी रुग्णालयात उपचार घेत असून आजतागायत १०३ रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधितांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील अद्यावत आरोग्यसेवा सातत्याने प्रयत्नशील आहे.

Web Title: Coronation liberation double century completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.