मुंबईवरून आलेली तरुणी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:36+5:30
तरूणीचा भाऊ व्यावसायिक आहे. तो एका किरायाच्या वाहनाने १२ मे रोजी आष्टी येथून मुंबईला गेला. त्यानंतर तो १४ मे रोजी आष्टीत पोहोचला. त्या वाहनात सदर तरूणी, तिची मैत्रिण, भाऊ आणि वाहनचालक असे चार व्यक्ती होते. आष्टीत परतल्यानंतर तरुणीसह तिच्या भावाला ताप आला. शिवाय तरुणीचे डोके तीव्र दुखत होते. प्रकृती बिघडल्यावर तरुणीच्या भावाने स्वत: व बहिणीला शासकीय रुग्णालयात न नेता औषधीच्या दुकानातून औषध घेत घरीच उपचार केले.

मुंबईवरून आलेली तरुणी कोरोना पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : मुंबई येथून आष्टी शहरात दाखल झालेली २२ वर्षीय तरुणी कोरोना बाधित असल्याचे पुढे आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मुलीच्या निकट संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिवाय दोन दिवस आष्टी शहरासह पेठअहमदपूर परिसरात ‘जनता कफ्यू’ पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तरूणीचा भाऊ व्यावसायिक आहे. तो एका किरायाच्या वाहनाने १२ मे रोजी आष्टी येथून मुंबईला गेला. त्यानंतर तो १४ मे रोजी आष्टीत पोहोचला. त्या वाहनात सदर तरूणी, तिची मैत्रिण, भाऊ आणि वाहनचालक असे चार व्यक्ती होते. आष्टीत परतल्यानंतर तरुणीसह तिच्या भावाला ताप आला. शिवाय तरुणीचे डोके तीव्र दुखत होते. प्रकृती बिघडल्यावर तरुणीच्या भावाने स्वत: व बहिणीला शासकीय रुग्णालयात न नेता औषधीच्या दुकानातून औषध घेत घरीच उपचार केले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तरूणीच्या भावाच्या मित्राने घरीच तपासणी केली. यानंतर सदर घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. २० मे रोजी आष्टी नगरपंचायतचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी तसेच पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर तरुणीचे घर गाठून तरूणीसह तिचा भाऊ, आई, वडील, आजी अशा पाच व्यक्तींना ताब्यात घेत त्यांना वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. सदर अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून मुंबईवरून आष्टीत दाखल झालेली तरुणी कोरोना बाधित असल्याचे तर तिच्या निकट संपर्कातील चार व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तरुणीला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लो-रिस्कमधील व्यक्ती होम क्वारंटाईन
सदर तरूणीच्या लो-रिस्क व हाय रिस्क मध्ये आलेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाच्यावतीने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात खासगी वैद्यकीय अधिकारी, नर्स, ब्रदर यांच्यासह एकूण १४ व्यक्तींचा समावेश आहे.
कारखाना केला सील
सदर तरूणीचे घर आणि तिच्या भावाचा कारखान्याला खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर शहरातील बाजारपेठही पुढील दोन दिवस बंद राहणार आहे. या भागात संचारबंदीची प्रभावी अंमलबजाणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षणाचे काम केले जात आहे.
तरुणीने दिली माहिती; मात्र कुटुंबीयांनी केले दुर्लक्ष
सदर तरूणीने एमफॉर्मचे शिक्षण घेतले असून ती मुंबईला एका नामांकीत कंपनीत नोकरीवर होती. आष्टीला परतल्यावर तिने प्रकृतीत अचानक बदल होत असल्याची माहिती तिच्या वडील व भावाला दिली. परंतु, तिच्या भावाने त्याकडे दुर्लक्ष करून तो गावभर फिरला. तर तरुणीचा चुलतभाऊ देखील नागपूरला माल विक्रीसाठी गेला होता. आष्टीच्या तरुणीला मुंबई येथून आणण्यासाठी आर्वीच्या एका बँकेतील कर्मचाºयाने वाहन दिले होते. त्यामुळे बँकही निर्जंतूक करण्यात आली आहे. शिवाय त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
चार वॉर्ड कंटेन्मेंट तर सहा वॉर्डांचा बफर झोनमध्ये समावेश
आष्टीत एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तेथे कंटेन्मेंट व बफर झोन तयार करण्यात आले आहे. रुग्ण सापडलेल्या भागाच्या आजूबाजूचा ३ किमी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार आष्टी शहरातील वॉर्ड क्रमांक ३,४,५ आणि १० हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. तर बफर झोनमध्ये वॉर्ड क्रमांक ६, ८, ११ व १२ तसेच पेठअहमदपूर, नवीन आष्टीतील वॉर्ड क्रमांक २ व ९ चा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
रिपोर्ट मिळताच पार पडली तातडीची बैठक
शुक्रवार २२ मे रोजी आष्टी येथील आरोग्य प्रशासनाला तरुणी कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त होताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष निचत, नगरपंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत, तहसीलदार आशीष वानखडे, ठाणेदार जीतेंद्र चांदे यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
परिसर केला जातोय निर्जंतुक
आष्टी शहरात कोरोनाचा रुग्ण आढळताच स्थानिक नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून आष्टी शहरासह परिसर निर्जंतूक केला जात आहे. शिवाय ठिकठिकाणी औषधांची फवारणी केली जात आहे.
कुटुंबीय संस्थात्मक विलगीकरणात
कोरोना बाधित तरुणीच्या निकट संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. तरुणीचे कुटुंबातील चार सदस्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पिपरी (मेघे) भागातील वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.