स्वातंत्र्यदिनी वर्ध्यात झाला कोरोना ब्लास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:53+5:30
कोविडला रोखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाला स्कोच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. परंतु, सध्या दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेही वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

स्वातंत्र्यदिनी वर्ध्यात झाला कोरोना ब्लास्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा होत असताना शनिवारी जिल्ह्यात ४१ नवीन कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची वाळूच सरकली होती. एकाच दिवशी तब्बल नवीन ४१ कोविड बाधित सापडल्याने आरोग्य विभागाचीही तारांबळ उडाली होती.
कोविडला रोखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाला स्कोच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. परंतु, सध्या दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेही वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार केल्यास या महिन्यातील १५ दिवसांत तब्बल १९२ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी बहूतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसली तरी त्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सात रुग्ण गृह अलगीकरणात
कोरोनाचे अती सौम्य लक्षणे असलेली किंवा कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सध्या सात कोविड बाधितांना प्रायोगिक तत्त्वावर गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अॅन्टिजेन किट; ४,८०९ व्यक्तींची झाली चाचणी
वर्धा जिल्हा प्रशासनाला २१ हजार अॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यानंतर ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन कोविड चाचणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत ४ हजार ८०९ व्यक्तींची कोविड चाचणी अॅन्टिजेन किटद्वारे करण्यात आली असून त्यापैकी १८८ व्यक्ती कोविड बाधित असल्याचे निदान झाले आहे. एकूणच सध्या अॅन्टिजन किटद्वारे कोविड चाचणी केल्यावर झटपट अहवाल प्राप्त होत असल्याने ही किट सध्या ही किट वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे.
२,६६९ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत एकूण २ हजार ८९० व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार ६६९ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १९२ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोविड चाचणीला दिली जातेय गती
कोराना संकट आणि पावसाळ्याचे एकत्रित आल्याने सध्या आरोग्य विभागावर नागरिकांच्या निरोगी आरोग्या विषयीचा दुहेरी ताण आहे. अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाकडून कोविड चाचणीला गती दिली जात आहे. कोविड चाचणी जास्त होत असल्याने रुग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.
२८६ व्यक्तींचा कोरोनावर विजय
जिल्ह्यात आतापर्यंत ४०३ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असली तरी त्यापैकी २८६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने नऊ व्यक्तींचा बळी घेतला असून एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सध्या जिल्ह्यात १०७ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण असून आज १५ व्यक्तींना कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
कोविड चाचण्या वाढविल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. शनिवार स्वातंत्र्यदिनी एकूण ४१ व्यक्तींचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. नागरिकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.