‘कोरोना’ची करणी, कशी होईल खरीप ‘पेरणी’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:25+5:30
लॉकडाऊन असल्यामुळे शेती संबंधित अनेक कामांत बाधा पोहोचत असल्यामुळे तसेच मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. खरिप हंगाम येऊन ठेपला असताना या हंगामात सर्वात जास्त क्षेत्रफळावर कापूस, सोयाबीन पिकाची लागवड केल्या जाते.

‘कोरोना’ची करणी, कशी होईल खरीप ‘पेरणी’?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना आजारामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण आता इतरही क्षेत्रावर आपली संकटरूपी छाया गडद करत आहे. कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाली असताना अवघ्या महिनाभरावर आलेल्या खरिप पेरणीवरही आता कोरोनाचे सावट पसरताना दिसून येत आहे.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शेती संबंधित अनेक कामांत बाधा पोहोचत असल्यामुळे तसेच मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. खरिप हंगाम येऊन ठेपला असताना या हंगामात सर्वात जास्त क्षेत्रफळावर कापूस, सोयाबीन पिकाची लागवड केल्या जाते. आधीच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिके देखील घरातच साठवून ठेवली आहे. शेतकऱ्यांची पिके घरातच पडून असताना त्याला योग्य भाव मिळत नसल्याने आगामी बी-बियाण्यांची चिंता शेतकऱ्यांना सतावत असून कोरोनाच्या करणीत शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरित परिणाम जाणवणार असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांवर ओढवले पुन्हा संकट
सध्या लॉकडाऊनमुळे खासगी व्यापारी शेतमाल घेण्यास मागेपुढे पाहत असल्यामुळे शेतमालाच्या हमी भावात अत्यंत घसरण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे लाखमोलाची पिके कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. परिणामी, खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंता
संचारबंदीमुळे शेती मशागतीची अनेक कामे अडकली आहेत. ट्रॅक्टरद्वारे शेती मशागत करण्याला शेतकरी पसंती देत असल्याने डिझेलसाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. इतरही अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत असून शेतीची कामे होतील की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.