खादी व ग्रामोद्योगाला सहकार्य करणार
By Admin | Updated: April 27, 2015 01:33 IST2015-04-27T01:33:18+5:302015-04-27T01:33:18+5:30
खादी व ग्रामोद्योग मंडळाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असून मंडळाला संपूर्ण पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन ...

खादी व ग्रामोद्योगाला सहकार्य करणार
वर्धा : खादी व ग्रामोद्योग मंडळाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असून मंडळाला संपूर्ण पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन उद्योग, खनिकर्म, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वर्धेत केले.
सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे आयोजित खादी व ग्रामोद्योग मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात उद्घाटनपर मार्गदर्शन करताना ते रविवारी बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ. पी.बी. काळे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रमचे सचिव श्रीराम जाधव, खादी आयोगाचे सेवानिवृत्त संचालक आर.एस.बैंदूर, प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, बलुतेदार संस्थेचे अध्यक्ष अदनाने उपस्थित होते.
राज्यमंत्री पोटे म्हणाले, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला पुनर्जिवित करावयाचे आहे. या मंडळामध्ये उभारी घेण्याची खूप क्षमता आहे. मंडळाच्या सर्व समस्यांवर सर्वोतोपरी विचार करून लवकरच या संदर्भात राज्यस्तरीय बैठकही घेण्यात येईल. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकोप्याने, जिद्दीने सर्वांना पुढे येऊन नवीन पिढी उत्तमोत्तम घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन बदल घडवून शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठीही कार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्योजकांनीही स्पर्धेची जाणीव ठेऊन आजच्या बाजारात आवश्यक असणाऱ्या बाबींवरही बारकाईने अभ्यास करून दर्जेदार पॅकिंग, मार्केटींग यावरही लक्ष केंद्रीत करावे, असेही ते म्हणाले.
संचालक काळे म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था आपल्या उत्पादनाच्या दर्जाची गुणवत्ता तपासून उत्पादनाचे प्रमाणन करते. त्या संबंधित प्रमाणपत्रही देते. याचा सर्व उद्योजकांनी लाभ घ्यावा. लहान-लहान उद्योजकांनीही या संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. राज्यातील उत्पादन स्पर्धेचाही बारकाईने अभ्यास करून उत्पादनाचा दर्जा तांत्रिक पद्धतीनेही विकसित करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सेवाग्राम आश्रमचे सचिव जाधव म्हणाले, प्रत्येकाने खादीचा वापर करणे आवश्यक आहे. खादी हे कापड नसून तो एक विचार आहे, हे प्रत्येकाचे अंगी भिनले पाहिजे. महात्मा गांधी यांचे विचार जगाला प्रेरक आहेत. त्यांचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आचरणातून त्यांचा विचार पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अधिवेशन आयोजन समितीचे मुख्य संयोजक प्रदीप चेचरे यांनी मंडळाची सद्यस्थिती, अडचणी व उपाययोजना याबाबत सविस्तर मांडणी केली. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश सुरुंग यांनी मानले. यावेळी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)