सांस्कृतिक भवनाकरिता सर्वतोपरी सहकार्य करणार
By Admin | Updated: December 20, 2015 02:07 IST2015-12-20T02:07:31+5:302015-12-20T02:07:31+5:30
वर्धा कलावंतांची नगरी आहे. वर्धा कला महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील कलावंतांना याठिकाणी कला सादर करण्याची संधी मिळते.

सांस्कृतिक भवनाकरिता सर्वतोपरी सहकार्य करणार
चंद्रशेखर बावनकुळे : वर्धा कला महोत्सवाला प्रारंभ
वर्धा : वर्धा कलावंतांची नगरी आहे. वर्धा कला महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील कलावंतांना याठिकाणी कला सादर करण्याची संधी मिळते. कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी वाव मिळावा या उद्देशाने येथे सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लोक महाविद्यालयाच्या प्रांगणावर वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित वर्धा कला महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, नगराध्यक्षत्रिवेणी कुत्तरमारे, सभापती मिलिंद भेंडे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, माजी खासदार दत्ता मेघे, अभ्युदय मेघे, किशोर दिघे, सुरेश वाघमारे, सुनील बुरांडे, अशोक झाडे , दिलीप अग्रवाल यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण राज्याला वर्धा कला महोत्सव दिशा देणारा महोत्सव असल्याचे सांगितले. तसेच वर्धा शहराच्या संपूर्ण विकासासाठी शासन कटीबद्ध असून सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर वर्धेतील कलावंतांचेही कौतुक करत याठिकाणी उपलब्ध संधीचा सर्वांनी लाभ घेण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दादाजी धुनिवाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले.
यावेळी खा. तडस यांनी कला गुणांना वाव देणारा हा महोत्सव असून वर्धेतील कलावंतांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दत्ता मेघे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आ. भोयर यांनी केले. संचालन संदीप चिचाटे यांनी केले. तर आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. महोत्सवातील कलावंतांनी मान्यवरांसमोर यावेळी कला सादर करून त्यांनी मने जिंकली. हा महोत्सव सहा दिवस सुरू राहणार आहे.(प्रतिनिधी)