शीतलता देणाऱ्या पेयांमुळे अनेकांच्या हातांना काम
By Admin | Updated: May 19, 2016 01:46 IST2016-05-19T01:46:33+5:302016-05-19T01:46:33+5:30
जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंशांची सीमा ओलांडली आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे.

शीतलता देणाऱ्या पेयांमुळे अनेकांच्या हातांना काम
भर उन्हातही होते विक्री : फिरत्या रसवंत्यांचाही आधार
पुलगाव : जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंशांची सीमा ओलांडली आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे शरीराचे उष्णतामान वाढत असून टपरी, ठेल्यावर थंडपेय, ऊसाचा रस, थंडगार बर्फाचे रंगबेरंगी विविध चवीचे आईसगोले, कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी आदी शीतपेय तहानलेल्या जीवांना शीतलता देत आहे. सोबतच शहर व परप्रांतीय बेराजगारांना रोजगारही मिळाला आहे.
सध्या शहरात आईसगोले व आईस डिशचा स्वाद घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे काही प्रमाणात आईस्क्रीम, कुल्फी व रसवंती आदी व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. शिवाय शहराच्या प्रत्येक भागात फिरत्या रसवंतीच्या हातगाड्याही दिसतात. यामुळे घरपोच ऊसाचा रस, निंबू शरबत, कुल्फी, आईस्क्रीम मिळत आहे. शहरात सुमारे ३५ ते ४० हातगाड्या फिरत असून या माध्यमातून बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड आदी राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इतकेच नव्हे तर आजच्या बदलत्या परिस्थितीत लग्न समारंभ, मुंज, वाढदिवस आदी अनेक मंगल समारंभात स्वरूची भोजनासोबतच आईसगोला, आईसडिश, कुल्फी, आईस्क्रीम आदींचे स्टॉल लागतात. यामुळे गळ्याला शीतलता देणाऱ्या थंडपेयांची मागणीही वाढली आहे.
भगतसिंग चौकात सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत हातगाडीवर आईसगोला साहित्य थाटून बसणारे बब्बूभाई मशिनच्या साह्याने तयार केलेला गोला कम आईस बार व विविध रंग टाकलेली आईसडीश शौकीन मंडळीचे आकर्षण ठरत आहे. इतकेच नव्हे तर या आईसगोला वा आईस डिशसाठी चांगलीच गर्दी होते. शहरातील राम व श्याम या जुळ्या केशरवाणी बंधूंचा जय माता दी नावाने प्रसिद्ध असलेला आईसगोला लग्न समारंभात निमंत्रितांचे लक्ष वेधतो. भर उन्हातही दुपारपासून रात्रीपर्यंत शहरातील विविध भागात थंडपेयाच्या बंड्या शौकिनांना शीतलता बहाल करताना दिसून येतात.(तालुका प्रतिनिधी)