देयकाकरिता कंत्राटदाराने लावला गळफास
By Admin | Updated: May 6, 2015 00:02 IST2015-05-06T00:02:02+5:302015-05-06T00:02:02+5:30
बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला.

देयकाकरिता कंत्राटदाराने लावला गळफास
चिठ्ठीही सापडली : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
हिंगणघाट : बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला. यात त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र अवचट (५०) रा. संत तुकडोजी वॉर्ड असे या कत्राटदाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र अवचट बांधकाम कंत्राटदार होते. त्यांनी एका खासगी कंपनीचा डांबर गुफीलींगचा लेबर कंत्राट घेतला होता. यात काम केल्यानंतर कामाचे देयक कंपनीला सादर केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ते देण्यास टाळाटाळ केली. अखेर कामाचे देयक देण्याचे नाकारले. या कंत्राटी कामासाठी जवळच्या नातेवाईकाकडून उसनवार घेवून एक २०७ वाहन व डांबराचे यंत्र खरेदी केले होते. घेतलेले पैसे परत करायचे असताना थकित देयकाकरिता नकार मिळाल्याने त्यांची मानसिक स्थिती ढासळली. अशा स्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पैसे देत नाही काय करायचे ते करून घे असे म्हटल्याचे मृतकाने मृत्युपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. या चिठ्ठीत त्या अधिकाऱ्यांची नावेही आहेत. या अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्यावर कारवाई करीत थकित देयकाची रक्कम परिवाराला देण्याचे व गोविंद सर यांना शिक्षा देण्याचे लिहून ठेवले आहे.
मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृतक व त्यांची पत्नी झोपून उठले. यावेळी नित्याप्रमाणे त्यांची पत्नी फिरायला गेली. त्या ७ वाजताच्या दरम्यान घरी परत आल्या असता त्यांना राजेंद्रचा मृतदेह पंख्याला नायलॉन दोरीने फासी लागून दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमले. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यावेळी मृतकाच्या खिशातून एक चिठ्ठी ताब्यात घेतली.
यासंदर्भात मृतकाचा मुलगा प्रणय राजेंद्र अवचट यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृतक राजेंद्र अवचट यांचा मुलगा प्रणय बुटीबोरी येथे अभियंता असून मुलगी नागपूरला अभियंता म्हणून नोकरीला आहे. अवचट यांच्या आत्महत्येने कंत्राटदार वर्गात विविध चर्चा सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
मृत कंत्राटदाराच्या चिठ्ठीत अधिकाऱ्यांची नावे
मृतक राजेंद्र यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्रास देणाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची नावे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत. शिवाय त्यात ही कंपनी एका मंत्र्याची असून ती दुसऱ्याच्या नावाने सुरू असल्याचे लिहिले आहे. यात कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मृतकाच्या खिशात असलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यात उल्लेख असलेल्या संबंधीतांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रारंभी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. काय ते सत्य तपासाअंती समोर येईलच.
- मोतीराम बोडखे, ठाणेदार, हिंगणघाट