कंटेनर-कार अपघातात चार जागीच ठार
By Admin | Updated: August 1, 2015 02:26 IST2015-08-01T02:26:30+5:302015-08-01T02:26:30+5:30
भरधाव कंटेनर व कारमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.

कंटेनर-कार अपघातात चार जागीच ठार
केळझर येथील भीषण घटना : मृतकांमध्ये एकाच कुटुंबातील तिघे, तर एक जखमी; वाहतुकीचा खोळंबा
केळझर : भरधाव कंटेनर व कारमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना केळझर येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये प्रदीप गोविंद भोंगाडे (४०) व त्याची आई त्रिवेणी गोविंद भोंगाडे (७५) व त्याची मुलगी रानू प्रदीप भोंगाडे (७) रा. खापरी, नागपूर तसेच संगमित्रा कपूरचंद गोंदाडे (४५) यांचा समावेश आहे.
या अपघातात शुभम प्रदीप भोंगाडे (११) हा गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. नागरिकांनी जखमी व मृतकांना बाहेर काढून रुग्णालयात हलविले. दरम्यान, वर्धा-नागपूर या मार्गाची वाहतूक प्रभावित झाली होती. घटनेची माहिती होताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या भीषण अपघातात कंटेनरला धडक दिल्यानंतर कार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन आदळली. यामुळे कारचा पुरता चुराडा झाला. घटनास्थळावरून कंटेनरचा चालक व क्लिनर पसार झाला. कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ४० केआर ६००४ ही कार वर्धेकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, केळझरनजीक नागपूरकडून येत असलेल्या एमएच ०४ डीडी १३३४ या कंटेनरवर धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, धडकेनंतर कार पलट्या घेत रस्त्यालगत असलेल्या नाल्यात स्थिरावली. अपघात होताच परिसरातील नागरिकही काही काळाकरिता स्तब्ध झाले. नेमके काय झाले हे कळण्यापूर्वी एकच किल्लोळ उडाला. यामुळे नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता त्यांना कार नाल्यात आदळल्याचे दिसून आले.
नागरिकांनी कारकडे जाऊन पाहिले असता त्यांना कारमधील प्रवासी आत दबून असल्याचे निदर्शनास आले. त्यांना सहज काढणे शक्य होत नसल्याने गॅस कटर व क्रेनच्या साहाय्याने त्यांना काढण्यात आले. याकरिता तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कारमधील जखमींना बाहेर काढताच त्यातील तिघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृतकात असलेला पुरूष हा गाडीचा चालक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, गृह अधीक्षक किल्लेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, ठाणेदार संतोष बाकल यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.(वार्ताहर)
गॅस कटर व जेसीबीच्या साहाय्याने मृतकांना बाहेर काढले
या अपघातात कार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळल्याने चेंदामेंदा झाली. यामुळे कारमध्ये फसलेल्यांना बाहेर काढणे सहज शक्य नसल्याचे दिसून आले. मृतकांना काढण्याकरिता गॅस कटर व जेसीबीचा वापर करण्यात आला. मृतदेह बाहेर काढण्याकरिता तब्बल दोन तासांचा कालावधी लागला.
अपघात नागपूर मार्गावर झाल्याने वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला होता. वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांना बरेच परिश्रम करावे लागले. दोन्ही दिशेने तब्बल एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.