ठेंगण्या पुलामुळे तुटतो सावंगी-देर्डा गावाचा संपर्क
By Admin | Updated: August 1, 2016 00:27 IST2016-08-01T00:27:03+5:302016-08-01T00:27:03+5:30
सावंगी व देर्डा या दोन गावांमधून नदी गेल्याने एका पुलाने हे दोन्ही गाव जोडले आहे;

ठेंगण्या पुलामुळे तुटतो सावंगी-देर्डा गावाचा संपर्क
नेहमीच होते वाहतूक ठप्प : उंची वाढविण्याची मागणी धुळखात
सेवाग्राम : सावंगी व देर्डा या दोन गावांमधून नदी गेल्याने एका पुलाने हे दोन्ही गाव जोडले आहे; मात्र हा पूल आता ठेंगणा पडत असून पावसाळ्यात त्यावरून पाणी जाणे नित्याचेच झाले आहे. पुलावरून पाणी वाहत असताना या दोन गावांचा संपर्क तुटतो. यामुळे सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून करण्यात आली असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
हमदापूर ते मांडगाव या मार्गावर अनेक गावे आहेत. यातील सावंगी व देर्डा या दोन गावाच्या मधून बोर व धाम नदी वाहत आहे. याच गावातील पुलाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. या संगमामुळे नदीचे पात्र विस्तारले आहे. या विस्तारीत पत्रावर मोठ्या पुलाची गरज असताना इथे ढोल्यांच्या रपट्याप्रमाणे पूल बनविण्यात आलेला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने नदीचे पाणी नेहमीच पुलावरून वाहते. यामुळे नदीला पूर येताच दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. जुलै महिन्यात या नदीला तीनवेळा पूर आला. तिनही वेळा या पुरामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता. गुरुवारी सायंकाळी या पुराचे पाणी ओसरल्याने आवागमन सुरू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. हमदापूर ते सावंगी या दरम्यान जेजूरी, बावापूर, आपटा, खुणी, नंदपूर आदी गावे आहेत. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता व नागरिकांना बाजारासाठी हमदापूर येथे यावे लागत आहे; मात्र या नदीला असलेल्या पुरामुळे या गावातील नागरिकांना गावातून बाहेर येणे व बाहेरून गावात जाणे कठीण होत आहे. या त्रासापासून बचावाकरिता या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मागणीला बराच काळ झाला तरी याकडे शासनाचे मात्र कायम दुर्लक्ष आहे.(वार्ताहर)
आष्टा-नांद्राचीही तीच समस्या
हमदापूरच्या पुढे आष्टा व नांद्रा ही दोन गावे असून मधून बोर नदी वाहते. या दोन्ही गावांना जोडणारा सिमेंट रपटा नदीमधून असून नदी ते नांद्रा गावापर्यंतचे १५० मी. चे अंतर आहे. नांद्रा ते नदी यामध्ये फक्त ७५ मीटरचा सिमेंट रस्ता बनविण्यात आला आणि उर्वरीत मात्र कच्चा रस्ता आहे. दोन्ही गावाचा शाळा, बाजार, आरोग्य व अधिकोषसाठी हमदापूर या गावाशी संबंध असून नांद्रा वासीयांना आता तर पिंपळगाव मार्गे हमदापूर व वर्धा गाठावे लागते.
नदीवरील रपटा नेहमीच पाण्याखाली असल्याने जाणे येणे बंद आहे. या समस्येमुळे गावकरी त्रस्त असून संकटसमयी लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रस्ताव पाठविला आहे. पुलाची उंची रपट्यासारखी असल्याने पावसाळ्यात मात्र आवागमन बंद राहते. उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून सतत होत असल्याचे नांद्रा येथील सरपंच संदीप लांबट यांनी सांगितले.