असुविधांमुळे ग्राहक त्रस्त
By Admin | Updated: August 26, 2016 02:08 IST2016-08-26T02:08:10+5:302016-08-26T02:08:10+5:30
स्थानिक बँक आॅफ इंडियाची शाखा अत्यल्प जागेत कार्यरत आहे. बँकेतील असुविधांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत

असुविधांमुळे ग्राहक त्रस्त
बँकेतील प्रकार : शेतकऱ्यांची लूट, पीक कर्जाची १९० प्रकरणे मंजूर
ेकारंजा (घा.) : स्थानिक बँक आॅफ इंडियाची शाखा अत्यल्प जागेत कार्यरत आहे. बँकेतील असुविधांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बँकेतून पीक कर्जाची आतापर्यंत १९० नवीन प्रकरणे मंजूर झाली असून या कर्जाकरिता सर्च रिपोर्टच्या नावावर मनमानी शुल्क आकारले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
शहरात चार वर्षांपूर्वी बँक सुरू करण्यात आली होती. ती एका छोट्या खोलीत आहे. आता लोकसंख्या व ग्राहकांची संख्या वाढत असून ही जागा अपूरी पडत आहे. यामुळे ग्राहकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अनेक असुविधा असलेली ही इमारत २० वर्षांच्या करारपट्टीवर भाड्याने घेताना बँक व्यवस्थापनाने भविष्यात होणाऱ्या विस्ताराचा कुठलाही विचार केलेला नसल्याचेच यातून दिसून येत आहे. या बँकेत ग्राहकांना पैसे काढणे वा टाकण्यासाठी रांग लावण्यास जागा नाही. ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा नाही. बाजारातील गर्दीप्रमाणे महिला-पुरूषांना एकमेकाला चिकटून उभे राहावे लागते. पैसे काढण्याची स्लीप भरायला टेबल नाही. पासबुक प्रिंट करणारी मशीन बंद असते. बँकेत ग्राहकांना उभे राहण्यासाठी वा बसण्यासाठी जागा नसल्याने आर्थिक व्यवहार करणे धोकादायक झाले आहे. पिण्याच्या पाण्याची व ग्राहकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही.
बँकेचे एटीएम मशीन नेहमीच बंद असते. झालेले आर्थिक व्यवहार एसएमएस करून ग्राहकांना कळविण्याची तसदी घेतली जात नाही. अशा अनेक मुलभूत सुविधा नसलेल्या या बँक इमारतीचा भाड्याचा २० वर्र्षांचा करार रद्द करून बँकेसाठी नवीन पुरेशी जागा असलेली इमारत भाड्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे. जेवणाच्या सुटीत बँकेचे दार बंद करण्यात येते. यामुळे ग्राहकांना पायऱ्यांवर बसावे लागते.
पीक कर्जाची नवीन १९० तर नूतनीकरणाची ८० प्रकरणे मंजूर केली. एक लाखापेक्षा अधिक कर्जासाठी सर्च रिपोर्ट सादर करावा लागतो. यात मनमानी शुल्क आकारले जाते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)