बांधकाम परवानगीसाठी पालिकेला लागतो वर्षभराचा कालावधी
By Admin | Updated: March 18, 2015 01:58 IST2015-03-18T01:58:47+5:302015-03-18T01:58:47+5:30
स्वत:च्या प्लॉटवर कॉम्प्लेक्स बांधण्याकरिता दोन व्यक्तींनी पालिकेला परवानगी अर्ज सादर केला़ या प्रकरणास वर्षभराचा कालावधी लोटला; ..

बांधकाम परवानगीसाठी पालिकेला लागतो वर्षभराचा कालावधी
आर्वी : स्वत:च्या प्लॉटवर कॉम्प्लेक्स बांधण्याकरिता दोन व्यक्तींनी पालिकेला परवानगी अर्ज सादर केला़ या प्रकरणास वर्षभराचा कालावधी लोटला; पण अद्यापही परवानगी देण्यात आली नाही़ यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून याबाबत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिल करण्यात आले आहे़
संदीप कदम व डॉ. नीरज कदम यांना स्वत:च्या मालकीच्या प्लॉट क्रं. ७ पांडुरंग वॉर्ड येथे कॉम्प्लेक्स बांधावयाचे आहे. यासाठी त्यांनी २ डिसेंबर २०१३ रोजी ऩप़ मुख्याधिकारी तथा नियोजन प्राधिकरण यांच्याकडे बांधकाम परवानगीचा अर्ज, बांधकाम नकाशे व संबंधित सर्व कागदपत्रे सादर केली. सदर प्रकरणात ऩप़ कडून सात महिन्यांपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ७ जुलै २०१४ रोजी काही त्रृटी असल्याचे कळविले़ सदर त्रूटींची पुर्तता करून पुन्हा ३० सप्टेंबर रोजी ऩप़ कार्यलयात नकाशे सादर केले; पण ६० दिवसांतही बांधकाम परवानगीबाबत पालिकेने कुठलीही कारवाई केली नाही़ यामुळे संदीप कदम व डॉ. नीरज कदम यांनी स्टॅन्डर्ड डेव्हलपमेंट कंट्रोल अॅण्ड प्रमोशन रेग्यूलेशन फॉर म्युनसीपल कौन्सिल २१ नोव्हेंबर २०१३ च्या कलम ६.६.३ नुसार सदर बांधकाम परवानगी ‘डिमड् परमिशन’ झाली असल्याचे मुख्याधिकाऱ्यांना ३० डिसेंबर १४ ला कळविले़ सदर बांधकाम नकाशाची ‘सॅक्शन्ड कॉपी’ व ‘कमेन्समेंट सर्टिफिकेट’ देण्याकरिता विनंती केली; पण अद्याप कारवाई झाली नाही़ याबाबत जिल्हाधिकारी नवीन सोना व विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले़ यावरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़(तालुका प्रतिनिधी)