कांबळे यांना बांधकाम, अग्रवाल यांना कृषी समिती
By Admin | Updated: October 18, 2014 01:47 IST2014-10-18T01:47:09+5:302014-10-18T01:47:09+5:30
जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली़ या सभेत सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले़ ...

कांबळे यांना बांधकाम, अग्रवाल यांना कृषी समिती
वर्धा : जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली़ या सभेत सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले़ यामध्ये बांधकाम व अर्थ समिती उपाध्यक्ष विलास कांबळे यांना देण्यात आले़ यापूर्वी उपाध्यक्षांकडे कृषी व पशु संवर्धन ही समिती होती़ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी हा बदल केला असून कृषी व पशुसंवर्धन समिती श्यामलता अग्रवाल यांच्याकडे सोपविण्यात आली़
अध्यक्ष चित्रा रणनवरे यांच्याकडे जल व्यवस्थापन व सामान्य प्रशासन कायम ठेवण्यात आले़ कृषी व पशुसंवर्धन समितीची जबाबदारी सभापती श्यामलता अग्रवाल यांना देण्यात आली़ अग्रवाल यांच्या रूपाने नाचणगाव जि़प़ गटाला पहिल्यांदाच सभापती पदाचा मान मिळाला आहे़ महिला सभापतीला कृषी व पशुसंवर्धन ही समिती दुसऱ्यांदा महिला सभापतीला मिळाली आहे़
सभापती मिलिंद भेंडे यांना शिक्षण व आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली़ भेंडे दुसऱ्यांदा सभापती झाले असून ते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे हीच विषय समिती होती़ सभापती वसंतराव पाचोडे यांच्यावर समाज कल्याण समितीची जबाबदारी सोपविण्यात आली़ सभापती चेतना मानमोडे यांच्याकडे महिला व बाल कल्याण समिती सोपविण्यात आली़
नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये मिलिंद भेंडे जि़प़ सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. इतर सर्व पदाधिकारी हे पहिल्यांदाच जि़प़मध्ये निवडून गेले आहे़ चित्रा रणनवरे यांच्या रूपाने हिंगणी, विलास कांबळे यांच्या रूपाने सावंगी (मेघे), मिलिंद भेंडे यांच्या रूपाने तळेगाव (टा़), श्यामलता अग्रवाल यांच्या रूपाने नाचणगाव, वसंत पाचोडे यांच्या रूपाने जळगाव, तर चेतना मानमोडे यांच्या रूपाने कारंजा जि.प. सर्कलला सभापतीपदाचा बहुमान मिळाला आहे़ सभेनंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला.(जिल्हा प्रतिनिधी)