संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार
By Admin | Updated: March 8, 2015 01:44 IST2015-03-08T01:44:45+5:302015-03-08T01:44:45+5:30
संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे. ही मुक्तता सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून प्राप्त होणारी आहे; पण ज्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, असे वाटते ....

संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार
वर्धा : संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे. ही मुक्तता सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून प्राप्त होणारी आहे; पण ज्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, असे वाटते आणि इतरांचे अस्तित्वही ज्यांना नकोसे वाटते, तेच या संविधानाचे खरे मारेकरी आहेत, असे प्रतिपादन अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक अॅड. गणेश हलकारे यांनी केले़
अ.भा. अंनिसच्या जिल्हा व तालुका शाखेद्वारे १९ व्या लोकजागर होलिकोत्सवात अॅड. हलकारे यांचे ‘संविधानाचे मारेकरी’ विषयावर व्याख्यान आयोजित होते. स्थानिक स्मशानभूमीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे तर अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक, चित्रकार सुनील यावलीकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वानखेडे, अ.भा. अंनिसचे राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, डॉ. सुभाष खंडारे, प्रबोधनकार भाऊ थुटे, सुधीर गिऱ्हे, राजू थूल, माजी अध्यक्ष सुरेश राहाटे, कार्याध्यक्ष प्रा. सुचिता ठाकरे, संघटक पंकज वंजारे उपस्थित होते़
या देशातील प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय, त्यांचे सार्वभौमत्व, व्यक्तिस्वातंत्र्य यासाठी संविधान आहे; पण देशातील वर्णवादी, धर्मांधता, माओवाद, नक्षलवाद साम्राज्यवादी भांडवलशाही स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांनाच छेद देत आहे. देशातील या सनातनी मानसिकतेचे बळी चार्वाक, तुकाराम, गांधीपासून दाभोळकर, पानसरेंपर्यंतचे व्यक्तीस्वातंत्र्य जोपासणारे विचारवंत ठरले आहेत. मनूचे संविधान संपुष्टात आणण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे; पण धर्मांध शक्तींना लोकशाही संसद नको तर धर्मसंसद हवी आहे. आम्हीच तेवढे श्रेष्ठ, असे मानणारे कोणत्याही धर्माचे कट्टरवादी असो, हे संविधानाचे मारेकरीच आहेत, असे हलकारे म्हणाले.
देशातील लोकशाहीला दुसरा मोठा धोका नक्षलवादी संघटनांचा आहे. त्यांना भारताच्या लोकशाहीवर आधारित संविधान मान्य नाही. या देशाची आर्थिक धोरणे स्वमर्जीनुसार ठरविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांही संविधानाच्या मारेकरी आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. कल्याणकारी राज्याची संकल्पना टप्प्या-टप्प्याने देशातून बाद झाली़ जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावावर देशाचे सार्वभौमत्व संपुष्टात आणण्याचे काम सुरू झाले आहे. अशावेळी संविधानाचे प्राणपणाने रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे. संविधानाच्या मारेकऱ्यांचा पराभव करायचा असेल तर आम्ही मुकी बिचारी जनावरे नसून विचार करणारी माणसे आहोत, या जाणिवेतून एक व्हा, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक हरिष इथापे यांनी केले. संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार सुचिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला संजय जवादे, अविनाश हलुले, आकाश जयस्वाल, शुभम जळगावकर, पराग दांडगे, सलील वानखडे, अंकुश कत्रोजवार, राहुल तेलरांधे, गणेश शेंडे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)