मोदी फॅक्टरला गटबाजीची जोड आढावा मतदारसंघाचा
By Admin | Updated: May 17, 2014 23:48 IST2014-05-17T23:48:00+5:302014-05-17T23:48:00+5:30
लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे पानिपत झाले. जिल्ह्यात काँग्रेसची बाजू मजबूत असताना विक्रमी मतांनी झालेला पराभव नेते आणि पक्षश्रेष्ठींना

मोदी फॅक्टरला गटबाजीची जोड आढावा मतदारसंघाचा
सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे पानिपत
वर्धा : लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे पानिपत झाले. जिल्ह्यात काँग्रेसची बाजू मजबूत असताना विक्रमी मतांनी झालेला पराभव नेते आणि पक्षश्रेष्ठींना चिंतन करायला लावणारा आहे. विधानसभा क्षेत्रात किती इमानेइतबारे काम झाले, याचाही आढावा पक्षाने घेण्याची गरज कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात काँगे्रसचे अनेक चेहरे पाहावयास मिळतात़ हे गटबाजीचे राजकारण तसेच वर्धा जिल्ह्याचा इतिहासच आहे़ हाच इतिहास नव्याने रचला गेल्याचे दिसून आले़ काँगे्रसची गटबाजी आणि सहकार गटाची वरवर सोबती काँगे्रस पराभवाचे एक कारण ठरली़ धामणगाव विधानसभा मतदारांमध्ये काँगे्रस सरकारप्रती असलेला रोष आणि निवर्तमान खासदारांनी जनतेकडे पाच वर्षे फिरविलेली पाठ, यामुळेही काँगे्रसविरोधी वातावरण तयार झाले़ शिवाय जातीचे समीकरनही विरूद्ध बाजूने गेल्याने कमळ सरसावले़ हिंगणघाट मतदार संघात काँगे्रस-राष्ट्रवादीची कायम धुसफूस राहिली आहे़ सहकार गटाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य सत्तास्थाने असतानाही अंतर्गत कलहामुळे त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही़ शिवाय विरोधकांचे गोडवे गाण्यातही अनेक जण खुष होते़ भाजपाचे मात्र उलट होते़ येथे शिवसेनेचे आ़ शिंदे यांनी जीव ओतून काम केले आणि कुणावार यांचीही मदत झाली़ शिवाय कार्यकर्तेही शब्दाबाहेर नसल्याने मताधिक्यामध्ये वाढ होऊन कमळाचा मार्ग प्रशस्थ झाला़ मोर्शी विधानसभा क्षेत्रात काँगे्रसचे निवर्तमान खा़ दत्ता मेघे निवडणुकीनंतर मतदारसंघात फारसे फिरकले नाही़ अमरावती-नरखेड रेल्वे मार्गावरील मोर्शी व वरूड येथे एक्स्प्रेस रेल्वेचा थांबा ते मिळवून देऊ शकले नाही़ यामुळे मोठी नाराजी पसरलेली होती़ आर्वी मतदार संघात नवमतदारांनी मोदी लाटेला दिलेला प्रतिसाद आणि परिवर्तनाच्या दिशेने केलेली वाटचाल भाजपासाठी महत्त्वाची ठरली़ शिवाय जात फक्टरनेही कमाल दाखविली़ काँगे्रसची प्रचारात आघाडी दिसत असली तरी अंतर्गत धुसफूसही होती़ भाजपचा प्रचार संथगतीने वाटचाल करीत पूढे गेल्याने सरशी मिळाली़ देवळी विधानसभा मतदार संघात कॉगे्रसच्या गोटातून प्रारंभापासून झालेल्या काही चुकांमुळे वर्धा लोकसभा मतदार संघात मोदी लहर प्रभावी ठरली़ स्वगृही विजयी मिरवणुकीत नवनिर्वाचित खा. रामदास तडस.