दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे केले एकत्रिकरण
By Admin | Updated: April 29, 2015 01:55 IST2015-04-29T01:55:27+5:302015-04-29T01:55:27+5:30
वायगाव (नि़) लगतच्या इटाळा शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे भूमी अभिलेख विभागाने ...

दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे केले एकत्रिकरण
वर्धा : वायगाव (नि़) लगतच्या इटाळा शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे भूमी अभिलेख विभागाने एकत्रिकरण केले़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे़ ही चुक सुधारण्याकडेही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे़
सोनेगाव (बाई) येथील शेतकरी ठमेकर यांची वायगाव (नि़) येथील मौजा इटाळा येथे शेती आहे़ या शेतीचे एकत्रिकरण करण्यात आले़ भूमी अभिलेख कार्यालयाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ १६ एकर शेतात कुठलाही व्यवसाय व आर्थिक व्यवहार करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत़ भूमी अभिलेख कार्यालयामार्फत भूमी एकत्रिकरणात अधिकाऱ्यांनी मौजा इटाळा परिसरातील केशव जगन्नाथ धांदे यांची ४० आऱ शेती ही ठमेकर यांच्या १६ एकर शेतीमध्ये एकत्रित केली़ यामुळे ठमेकर यांची १६ आणि धांदे यांची एक अशी १७ एकर शेती झाली़ यातील एक एकर धांदे कुटुंबातील दहा सदस्यांची नावे १६ एकरमध्ये जोडली गेली आहेत़ भूमी एकत्रिकरण होऊन आठ ते दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे़
भूमी अभिलेख विभागाकडून झालेली ही चूक दुरूस्त करण्यात यावी, यासाठी ठमेकर कुटुंबीयांनी गत चार वर्षांपासून प्रकरण पाठपुरावा चालविला आहे; पण भूमी अभिलेख वर्धा कार्यालयाद्वारे टाळाटाळच केली जात आहे़ दोन शेतकऱ्यांच्या शेताचे एकत्रिकरण करण्यात आल्याने ठमेकर यांना आपल्या १६ एकर शेतीचा कुठलाही व्यावसायिक वापर करण्यात येत नाही़ शिवाय ती विकण्यात वा आर्थिक व्यवहार करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभही त्यांना घेता येणे अशक्य झाले आहे़ संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेती विलग करण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)