ग्रा.पं.मध्येही काँग्रेसच वरचढ
By Admin | Updated: July 28, 2015 03:07 IST2015-07-28T03:07:54+5:302015-07-28T03:07:54+5:30
जिल्ह्यात ३१ सार्वत्रिक तर सात गावातील पोटनिवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. जिल्ह्यातील एकंदरीत

ग्रा.पं.मध्येही काँग्रेसच वरचढ
आष्टी, देवळीत काँग्रेस: वर्धा, कारंजा व समुद्रपूर संमिश्र तर सेलूत सत्ताबदल
वर्धा : जिल्ह्यात ३१ सार्वत्रिक तर सात गावातील पोटनिवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. जिल्ह्यातील एकंदरीत निकाल पाहता जिल्ह्यात भाजपला पछाडत काँग्रेसच वरचढ असल्याचे दिसून आले. काँग्रेचा गढ म्हणून ओळख असलेल्या आष्टी व देवळीत काँग्रेसने सत्ता राखली. वर्धा, कारंजा व समुद्रपूर येथे काँग्रेस राष्ट्रवादी समर्थकांना संमिश्र यश आले आहे. तर सर्वांचे लक्ष असलेल्या सेलू तालुक्यात सत्ताबदल झाला. येथे भाजप समर्थित निम्म्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.
वर्धा तालुक्यातील सोटाडा गावातील सार्वत्रिक निवडणूक होती. यात कॉग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीला सात जागा घेता आल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले. जनता जनार्दन आघाडीला दोन जागांवर समाधान माणावे लागले. तर भाजपा समर्थित जनहितार्थ ग्रामविकास आघाडीला तीनच जागा मिळविता आल्या.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या माणल्या जाणाऱ्या सेलू तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायतमध्ये सत्तारूढ गटाकडून रिंगणात असलेले सरपंच, उपसरपंच विजयी झाले; मात्र या ग्रामपंचायतमध्ये सत्तारूढ गटाला पाच तर विरोधकांना दहा जागा मिळाल्या. येळाकेळी ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सरपंच बंडू गव्हाळे यांचा अवघ्या नऊ मतांनी पराभव झाला.
देवळी तालुक्यातील बोरगाव (आलोडा), आकोली व कवठा या तीन ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांच्या गटाने घवघवीत यश संपादीत केले. यामध्ये भाजपा गटाचा दारुण पराभव झाला.
कारंजा तालुक्यात पाडी, कन्नमवारग्राम, आजनडोह, नरसिंगपूर, जऊरवाडा येथे सार्वत्रिक निवडणूक तर खैरवाडा, मेटहिरजी, दानापूर, काजळी व बेलगाव येथे पोटनिवडणूक पार पडली. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १४ उमेदवार अविरोध तर पोटनिवडणुकीमध्ये तीन उमेदवार अविरोध निवडून आलेत. सिंदीविहीरी, माळेगाव (काळी) व पालोरा येथे प्रवर्गानुसार योग्य उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे तेथील प्रत्येकी एक जागा रिक्त आहे.
आष्टी तालुक्यातील अंतोरा आणि पोरगव्हाण ग्रा.पं.वर कॉँग्रेसने बहुमताने विजय संपादीत केला. अंतोरा येथे नऊ पैकी सात जागेवर कॉँग्रेस तर दोन जागा भाजपाला मिळाल्या. पोरगव्हाण येथे सहा जागा कॉँग्रेस तर तीन जागा भाजपाला मिळाल्या. समुद्रपूर तालुक्यातील झालेल्या निवडणुकीत रॉँकाने चार ग्रामपंचायतीवर दावा सांगितला. तर सेनेने तीन व भाजपाने तीन ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला. आर्वी तालुक्यातील रोहणा ग्रामप्रंचायत काँग्रसने राखल्याचे दिसून आले आहे. या निवडणुका जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची नांदी ठरत आहे.
सेलूतील सात जागा रिक्त
४सेलू तालुक्यातील आलगाव, बोंडसूला, आमगाव (ख.), बाभुळगाव, सोंडी व सुकळी स्टेशन या गावात असलेल्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवार नसल्याने येथील जागा अद्यापही रिक्तच असल्याचे दिसून आले आहे