२८८ पैकी १२८ सिंचन विहिरींची कामे पूर्णत्वास
By Admin | Updated: November 26, 2015 02:01 IST2015-11-26T02:01:05+5:302015-11-26T02:01:05+5:30
तालुकास्तरावर सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्ह्यात आर्वी तालुक्याला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले होते.

२८८ पैकी १२८ सिंचन विहिरींची कामे पूर्णत्वास
सर्वाधिक उद्दिष्ट आर्वीला : उर्वरित ३८ विहिरींची कामे प्रगतिपथावर
सुरेंद्र डाफ आर्वी
तालुकास्तरावर सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्ह्यात आर्वी तालुक्याला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील २८८ विहिरींपैकी १२८ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ३८ सिंचन विहिरींची कामेही सुरू आहेत.
आर्वी तालुक्यात एकूण ४९ ग्रामपंचायती आहे. यात अनेक ग्रा.पं. ना दहा सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात कुशल व अकुशल, असे दोन प्रकार करण्यात आले होते. मनरेगांतर्गत या सिंचन विहिरींची कामे मोडतात. यात ६० टक्के विहिरींचे बांधकाम लाभार्थ्यांना करून द्यायचे असते तर ४० टक्के काँक्रीटकरण स्वरूपाचे काम मनरेगा योजनेंतर्गत करून दिले जाते. या सिंचन विहिरी बांधकामात ६० टक्के कामे लाभार्थ्यांना करणे गरजेचे आहे. तालुक्यात अकुशल, कुशल हा शासन स्तरावरचा रेषो बसत नसल्याने सिंचन विहिरींची कामे रखडतात. ही विहिरींची कामे पूर्ण करताना गावाच्या नऊ किमीपर्यंतच्या परिसरातील मजुरांना रोजगार देणे बंधनकारक आहे. यामुळे विहिरींच्या माती व बांधकामासाठी मजूर मिळत नाही. परिणामी, सिंचन विहिरी रखडतात. गाव परिसरातील मजूर घेण्याची अट शिथील करणे गरजेचे झाले आहे. यातील ६० टक्के निधी मातीकाम तर ४० टक्के निधी पक्क्या बांधकामावर खर्च केला जातो.
सिंचन विहिरी बांधकामासाठी आता नवीन निकषानुसार ग्रा.पं. निहाय उद्दिष्ट देऊन ग्रा.पं. स्तरावर मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते, ग्रा.पं. निहाय शौचखड्डे व इतर मातीकामे घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे दिसते. अहिरवाडा, सर्कसपूर या गट ग्रा.पं. मध्ये २०१३-१४ या वर्षात पांदण रस्त्यांची अनेक कामे झाली; पण या गावाला सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले गेले नाही. २०१५-१६ मध्ये या गावात सिंचन विहिरींची कामे नाही. परिणामी, लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रा.पं. निहाय सिंचन विहिरींची कामे देण्याची मागणी होत आहे.