डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण अवघडच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST2021-05-31T05:00:00+5:302021-05-31T05:00:09+5:30
लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर लसीबाबत अनेक गैरसमज सोशल मीडियावर पसरविले जात होते. पण जिल्ह्यात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे कोरोना काळात महत्त्वाची ठरणाऱ्या महालसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिासाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविड लसीचे तब्बल २ लाख ७३ हजार ८७८ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.

डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण अवघडच!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखाहून अधिक आहे. पण आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २ लाख १८ हजार ९८० व्यक्तींना लसीचा पहिला तर ५४ हजार ८९८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी लसतुटवड्यामुळे कासवगतीनेच जिल्ह्यात महालसीकरण मोहीम सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच असल्याचे बोलले जात आहे.
लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर लसीबाबत अनेक गैरसमज सोशल मीडियावर पसरविले जात होते. पण जिल्ह्यात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे कोरोना काळात महत्त्वाची ठरणाऱ्या महालसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिासाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविड लसीचे तब्बल २ लाख ७३ हजार ८७८ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. मात्र, वर्धेकरांचा लसीकरण मोहिमेला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या तुलनेत सध्या अतिशय अल्प लससाठा वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे सध्यास्थितीत १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. असे असले तरी शासनाने वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठी उपलब्ध करून दिला आणि पुढेही लसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद राहिला तरच डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण होईल, असेही सांगण्यात येते. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना देण्यात येणारी व्हॅक्सिन ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्तच आहे.
लसीकरण केंद्रांची संख्या झाली ११५
- १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली असून सुरूवातीला मोजक्याच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात होती. तर हळूहळू लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ झाल्याने सध्या लसीकरण केंद्रांची संख्या ११५ झाली आहे. परंतु, लस तुटवड्यामुळे काही मोजक्यात केंद्रांवरून सध्या लाभार्थ्यांना कोविडची लस द्यावी लागत आहे.
एकाच दिवशी दहा हजार व्यक्तींना व्हॅक्सिनेशनचा विक्रम
- सध्या दरराेज सरासरी किमान १ हजार ५०० व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी तब्बल दहा हजारहून अधिक व्यक्तींना कोविडची व्हॅक्सिन दिल्याचा जिल्ह्यात विक्रम आहे. पण सध्या मुबलक लसच वर्धा जिल्ह्याला मिळत नसल्याने लसीकरण मोहिमेला पाहिजे तशी गतीच मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबले
जिल्ह्यामध्ये सुरूवातीपासूनच लसीचा तुटवडा जाणवला. आताही लस नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. मुबलक लससाठा मिळाल्यावर या वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना ऑनलाईन व अपॉईमेंट घेतल्यावर कोविडची लस देण्यास सुरूवात झाली होती. पण सध्या लस तुटवड्यामुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे.