ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करा

By Admin | Updated: December 7, 2014 22:57 IST2014-12-07T22:57:18+5:302014-12-07T22:57:18+5:30

देशाच्या अखंडतेसाठी अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. जिल्ह्यातील ज्या विरांनी बलिदान केले आहे अश्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वज निधी संकलित करण्यासाठी मोठ्या संख्येने मदत करावी,

Complete the target of flagged fund collection | ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करा

ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करा

वर्धा : देशाच्या अखंडतेसाठी अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. जिल्ह्यातील ज्या विरांनी बलिदान केले आहे अश्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वज निधी संकलित करण्यासाठी मोठ्या संख्येने मदत करावी, तसेच १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केले.
ध्वजदिन २०१४ च्या निधी संकलनाचा शुभारंभ शनिवारी विकास भवन येथे जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, कर्नल संदेश, आर. एस. मोहता मिलचे अनुपकुमार शुक्ला, पी. व्ही. टेक्साटाईल्सचे बी. आर. शहाणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वज निधी संकलनाचा कार्यक्रम सुरू करण्यात येतो. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येत असून, माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या उत्थानासाठी ध्वजनिधीचा उपयोग करण्यात येतो.
यावेळी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांच्या माता शांता महादेवराव वरहारे, मंजुळा भानुदास घुमडे, सीता पांडुरंग लाखे, नलिनी विनायक टिपले यांना तर मंदा मिलिंद कोल्हे या वीर पत्नीचा शाल, श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांचा पुरस्कार व शिष्यवृत्ती देवून विशेष गौरवही या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. देशाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांच्या माता, पत्नी यांचा सन्मान करणे, तसेच त्यांच्या मुलांना मदत करणे आपली जबाबदारी असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. ध्वजदिन कार्यक्रमात लोक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला. ले. धनंजय सदाफळे यांनी तर आभार सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वसंत यांनी मानले. अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Complete the target of flagged fund collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.