वादळी पावसाची नुकसान भरपाई द्या
By Admin | Updated: February 25, 2015 02:06 IST2015-02-25T02:06:42+5:302015-02-25T02:06:42+5:30
वादळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अद्यापही आढावा घेण्यात आला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही़ वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ...

वादळी पावसाची नुकसान भरपाई द्या
रोहणा : वादळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अद्यापही आढावा घेण्यात आला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही़ वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे़ परिसरात नुकसानीचे सर्वेक्षण करून प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
जिल्ह्यात १० फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरबरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले़ शिवाय आंबा बहर, संत्र्यांचा मृग बहर यांचेही मोठे नुकसान झाले. वेचणीला आलेला कापूसही ओला झाला. यासह शेतात कापणी करून ठेवलेल्या तुरीच्या गंज्या ओल्या झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. तुरीची मळणी केल्यानंतरही शेतात पडून असलेले तुरीचे कुटार ओले होऊन सडण्याची भीती आहे. यात शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले.
या पिकांची पाहणी करून महसूल व कृषी विभागाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावयास हवा होता; पण नुकसान झालेच नसल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली़ यामुळे नुकसानीची मदत मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षी खरीपाच्या पेरणीपासून नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत पिके जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली़ नैसर्गिक आपत्तीची ही मालिका रबी हंगामातही पिच्छा पुरवित आहे. यंदाचे साल नैसर्गिक आपत्तीचे ठरल्याने शेतकऱ्यांचीही गोची झाली आहे़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देत वादळी पावसाची मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)