भविष्य निर्वाह निधी कपातीचा ताळमेळ जुळेना
By Admin | Updated: October 29, 2014 22:54 IST2014-10-29T22:54:54+5:302014-10-29T22:54:54+5:30
शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात होऊनही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा लेखा विवरण पत्रात ताळमेव लागत नव्हता़ या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी

भविष्य निर्वाह निधी कपातीचा ताळमेळ जुळेना
वर्धा : शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात होऊनही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा लेखा विवरण पत्रात ताळमेव लागत नव्हता़ या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी संतोष वोहूळ यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्यासह शिक्षक समितीचे विजय कोंबे, नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर आदी उपस्थित होते़
शिक्षकांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची मासिक वर्गणी नियमित कपात केली जाते. २०१२-२०१३ या आर्थिक वर्षाच्या कपातीचे विवरण पत्र मागील काही दिवसांपूर्वी शिक्षकांना मिळाले. यात सर्वच शिक्षकांच्या विवरण पत्रात तीन ते पाच महिन्यांच्या कपात रकमा दर्शविल्या नाहीत. या संबंधाने शिक्षक समितीने दिलेल्या निवेदनानंतर मुख्य लेखा तथा वित्त अधिकाऱ्यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेस बोलविले होते़ पंचायत समितीकडून येणारे कपातीचे धनादेश वा चालान अनेक महिने वित्त विभागात येत नसल्याने कोटीच्या रकमा २०१२-१३ च्या विवरण पत्रात नोंदविल्या नसल्याचे लेखा विभागाने स्पष्ट केले़
पुढील दोन महिन्यांत भविष्य निर्वाह निधी २०१३-१४ चे विवरण पत्र दिले जाणार आहे़ यात मागील सर्व त्रूटींची पूर्तता केली जाईल, असेही मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी संतोष वोहूळ यांनी सांगितले. परिभाषित अंशदायी पेन्शन कपातीचा शिक्षक संवर्गाचा मागील हिशेब पूर्ण झाला आहे; पण ग्रामसेवकांच्या कपातीचे चालान तीन पंचायत समित्यांनी पाठविलेले नाही. यामुळे हिशेबाचे विवरण देण्यास विलंब होत असल्याचे लेखा अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडून धनादेश पाठविण्यास झालेल्या विलंबामुळे होणाऱ्या व्याजाच्या नुकसान भरपाईची मागणी केली़ शिवाय विलंब करणाऱ्या पं़स़ मधील दोषींवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली. परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेत येणाऱ्या शिक्षकांचे हिशेबपत्र शीघ्र द्यावे, त्यांचे व्याज वा सममूल्य रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़
पुढील काही काळात भविष्य निर्वाह निधीचा हिशेब आॅनलाईन देण्यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू असून भविष्यात हिशेबाच्या तक्रारी येणार नाहीत, असेही वोहूळ यांनी सांगितले. शिक्षकांच्या वेतनातील विलंब टाळण्यासाठी कोषागार कार्यालयाकडून धनादेश प्राप्त होताच त्याच दिवशी वित्ताप्रेषण पाठविले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ यावेळी शिक्षणाधिकारी काटोलकर, वरिष्ठ लेखा अधिकारी संदीप ओव्हाळ, शैलेश काळे, सहायक लेखा अधिकारी यादव, कनिष्ट प्रशासन अधिकारी आशिष दहीवडे, अशोक पवार, सोमंता फुटाणे आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)