जिल्ह्यात आम आदमी विमा योजना कागदावरच
By Admin | Updated: September 8, 2014 01:33 IST2014-09-08T01:33:57+5:302014-09-08T01:33:57+5:30
ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली.

जिल्ह्यात आम आदमी विमा योजना कागदावरच
अमोल सोटे आष्टी (शहीद)
ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना राबविताना संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. सन २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात केवळ ३० व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
आम आदमी विमा योजनेसाठी केंद्राकडून शंभर तर राज्याकडून शंभर रुपये असा एकूण २०० रुपयांचा वार्षिक हप्ता आहे. योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे अर्ज तलाठ्यांमार्फत भरावे लागतात. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५०० व दोन्ही अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपयांचे विमा संरक्षण दिल्या जाते. गत वर्षी एप्रिल २०१३ पासून मार्च २०१४ पर्यंत आष्टी तालुक्यात १७ हजार ४२५ कुटुंब, आर्वीत २२ हजार, कारंजात १९ हजार, देवळीत १३ हजार ४७०, वर्धेत १७ हजार ९००, सेलूत १२ हजार ६८५, हिंगणघाट येथे १९ हजार ४३०, आणि समुद्रपूर तालुक्यातील ११ हजार कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले.
या योजनेत पात्र झालेल्याचे पाल्य इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिमहिना शंभर रुपये प्रमाणे १० महिन्याचे एक हजार रुपये देण्यात येते. जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले; परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या हाती एक रुपयाही पडला नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने शासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
शासनाकडून शिष्यवृत्तीचा पाठपुरावा न झाल्यामुळे संबंधित शाळेचे विद्यार्थी व त्यांचे पालक, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांना भेटून माझ्या पाल्याच्या शिष्यवृत्तीचे काय झाले असा प्रश्न विचारत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ही योजना योग्य रित्या राबविण्यासाठी कुचराई करीत असल्याची माहिती आहे. शासनाने तत्काळ लाभ देण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे.