बाजार समितीत शेतमाल तारण योजनेला प्रारंभ
By Admin | Updated: October 30, 2016 00:57 IST2016-10-30T00:57:20+5:302016-10-30T00:57:20+5:30
शेतकऱ्यांना आर्थिक गरजेपोटी शेतमालाची काढणी सुरू झाल्यानंतर तो बाजार आवारात विक्रीसाठी आणावा लागतो.

बाजार समितीत शेतमाल तारण योजनेला प्रारंभ
शेतकऱ्यांना सुविधा : ६ टक्के दराने कर्ज
हिंगणघाट : शेतकऱ्यांना आर्थिक गरजेपोटी शेतमालाची काढणी सुरू झाल्यानंतर तो बाजार आवारात विक्रीसाठी आणावा लागतो. यामुळे शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. आर्थिक निकड असल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागतो. सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारात विक्रीसाठी आणल्यास वाढलेल्या भावाने विक्री करून अधिक रक्कम मिळू शकते. ही बाब लक्षात घेत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेस प्रारंभ केला.
सद्यस्थितीत सोयाबीनची खरेदी आधारभूत किंमतीच्या आत होत आहे. शेतकऱ्यांना शेतमाल कमी किंमतीत विकावा लागू नये म्हणून १५-२० वर्षांपासून सोयाबीन, तूर, चना, गहू व हळद या शेतमालाकरिता तारण योजना राबविली जाते. सदर योजना कृषी पणन मंडळाच्या शर्ती व अटीस अधीन राहून बाजार समितीमार्फत राबविण्यात येत आहे. त्या दिवशीचे बाजार भाव विचारात घेऊन प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही तत्कालीन बाजार भाव वा शासनाने जाहीर केलेली किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते. त्या बाजार भावानुसार किंमतीच्या ७५ टक्के गहू सोडून इतर शेतमालाकरिता तर गव्हाकरिता ५० टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांच्या मुदतीकरिता ६ टक्के व्याज दराने देण्यात येते. सदर योजनेंतर्गत दिलेल्या कर्जाचा भरणा १८० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. समितीच्या गोदामांमध्ये केवळ सोयाबीनची साठवणूक केली जाते.
शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतमाल विकण्यापेक्षा वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साफसफाई करून साठवणूक करावी. महामंडळाकडून मिळणारी वखार पावती, चालू वर्षाचा सातबारा, तलाठ्याचे संबंधित शेतमालाचे पीक पेरापत्रक, १०० रुपयांचा स्टॅम्प व ओळखपत्र समिती कार्यालयात जमा करावे तथा कर्ज मागणीचा प्रस्ताव भरून द्यावा. प्रस्ताव सादर केल्यापासून ४८ तासांत तारण कर्जाची रक्कम समिती शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे अदा करते.
ही योजना राबविण्यासाठी समितीद्वारे पाच कोटी रुपयांचा तारण कर्ज प्रस्ताव कृषी पणन मंडळास सादर करण्याबाबत सोमवारी संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात आला. यात गुरूवारी पाच शेतकऱ्यांद्वारे सादर सोयाबीन तारण कर्ज प्रस्तावाच्या अनुषंगाने ४ लाख २७ हजार रुपये वितरीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.(तालुका प्रतिनिधी)