घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर
By Admin | Updated: January 20, 2015 00:10 IST2015-01-20T00:10:51+5:302015-01-20T00:10:51+5:30
तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी आदी ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे.

घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर
पुरवठा विभागाचे दुर्लक्ष : निळ्या व्यापारिक सिलिंडरचा केवळ देखावाच
वर्धा : तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी आदी ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. वाणिज्य सिलिंडर टाक्यांचा देखावा करून घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याचे दिसते़
वर्धा तालुक्यात इंडियन, एचपी सिलिंडरचे वितरक आहेत़ घरगुती व वाणिज्य, असे दोन्ही प्रकारचे सिलिंडर त्यांना मागणीनुसार उपलब्ध होतात; पण यात व्यापारिक सिलिंडरची अधिक मागणीच होत नसल्याचे दिसून आले आहे़ शहराससह ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा कॅटींग व्यावसायिक व्यापारिक सिलिंडरऐवजी घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याचे दिसते़ व्यापारिक सिलिंडरच्या टाक्या दुकानासमोर ठेवून देखावा केला जातो़ समोर व्यापारिक सिलिंडरच्या टाक्या दिसत असल्याने संबधित विभागाद्वारे त्याकडे दुर्लक्ष केले जाते़
वितरकांकडील कर्मचारी घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करीत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत़ घरगुती सिलिंडरच्या नावावर जवळच्या व्यक्तीचे कार्ड दाखवून हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी, चायनीज दुकानदारांना सिलिंडर पुरविले जातात़ घरगुती सिलिंडरचा काळाबाजार होत असताना संबंधित विभाग कुठलीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत घरगुती सिलिंडरचा काळाबाजार थांबवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)