पारंपरिक यात्रा व मेळाव्यासाठी भराडी समाज झाला गोळा
By Admin | Updated: May 1, 2017 00:31 IST2017-05-01T00:31:52+5:302017-05-01T00:31:52+5:30
मागील दहा दशकांपासून येथे दरवर्षी भराडी समाजाचे (किंगरी वाजविणारे) लोक येतात.

पारंपरिक यात्रा व मेळाव्यासाठी भराडी समाज झाला गोळा
नाथजोगी समाज म्हणून ओळख : साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने विकासापासून दूर
समुद्रपूर : मागील दहा दशकांपासून येथे दरवर्षी भराडी समाजाचे (किंगरी वाजविणारे) लोक येतात. हा समाज महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे विखुरला आहे. या समाजाचे पुरूष, महिला, मुले, मुली अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एकत्र येतात. यंदाही या भराडी समाजाच्या लोकांचे धपकी परिसरात आगमन झाले आहे. परंपरेनुसार यांची यात्रा व मेळावा येथे भरणार आहे.
या यात्रेच्या कालावधीतच उपवर मुली व मुलांचे लग्न जुळविले जाऊन तेथेच विवाह पार पडतात. या निमित्ताने सर्व समाजातील घटकाच्या भेटीगाठी घेऊन माहिती घेतली जाते. या समाजाचे नेतृत्व सुंदरलाल व भक्तराज हे वर्धा जिल्ह्यातील धपकी येथे राहणारे करतात. ते तेथील माजी सरपंच होते. ही मंडळी विदर्भ, महाराष्ट्र व इतर प्रांतातून एकत्र येतात. यापूर्वी वाहनांची सोय नसल्याने सायकल, घोडे व इतर साधनांनी १५ दिवसांपूर्वी कोंबड्या, बकऱ्या व वस्तीला राहता येईल, असे बिराड सोबत आणत होते. परंपरेनुसार वस्तीचे ठिकाण गावाच्या दक्षिणेला राहत असून ते आपापल्या झोपड्या (तंबू) करून राहत होते. विखूरलेल्या व पोटासाठी भटकणाऱ्या या समाजाची नाथजोगी समाज अशी ओळख आहे. मुख्य प्रवाहापासून दूर झाल्याने परिस्थिती हलाखीची असून साक्षरतेचे प्रमाण अगदी नगण्य आहे. परिणामी, अंधश्रद्धा व रूढी परंपरेच्या विळख्यात सापडला आहे. घोडे, मेंढ्या, बकऱ्या पाळणे, गोणे शिवणे, किंगरी नावाचे वाद्य वाजविणे, घरोघरी जाऊन मिळेल त्यावर गुजराण करणे हेच यांचे कार्य आहे. हा समाज एका ठिकाणी स्थानिक नसल्याने कमालीचा दारिद्र्यात आहे. तेवढीच कमालीची उपजत संगीत कला अवगत असताना उपयोग नव्हता. काळानुसार धपकी सारख्या ठिकाणी काही प्रमाणात स्थाईक झाले.
हा समाज गुरूला आपले दैवत मानतो. त्यांच्या ठिकाणी दैवी शक्ती असल्याचा त्यांचा समज असतो. त्यांचे दोन गुरू असून ते सख्खे भाऊच आहेत. एकाचे नाव बाळाजी शिंदे तर दुसरा पुजारी महाराज. काही वर्षांपूर्वी हे दोघे भाऊ समुद्रपूरला आले असता वयाने मोठे पुजारी महाराजांचा मृत्यू झाला. नितांत श्रद्धेपोटी त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले. मृत्यू अमावस्येच्या दिवशी झाल्याने या दिवसावर ते एकत्र येतात. सोबत आणलेले कोंबडे, बकरे घेऊन गावाच्या पूर्वेकडे एका टोकावर असलेल्या गुरूच्या समाधीकडे लाल रंगाचे झेंडे घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. गुरूची पूजा करून नैवद्य ठेवला जातो. यानंतर एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला जातो. यानंतर ठिक-ठिकाणावरून आलेली ही मंडळी परतीच्या प्रवासाला निघतात. पुढील वर्षी याच दिवशी याच ठिकाणावर पुन्हा यात्रा आणि मेळावा घेत विधिवत पूजन केले जाते.(तालुका प्रतिनिधी)