वृद्धेच्या पोटातून निघाला २६ किलोचा गोळा
By Admin | Updated: February 20, 2016 03:04 IST2016-02-20T03:04:13+5:302016-02-20T03:04:13+5:30
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात भरती झालेल्या जमिलाबी खान ...

वृद्धेच्या पोटातून निघाला २६ किलोचा गोळा
सावंगी (मेघे) रुग्णालयात शस्त्रक्रिया : महिलेची प्रकृती धोक्याबाहेर
वर्धा : सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात भरती झालेल्या जमिलाबी खान या ६५ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून २६ किलो वजनाचा मांसल गोळा शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या काढण्यात आला.
पोटावर मोठ्या प्रमाणात सूज आली आहे आणि त्यामुळेच अनेक दिवसांपासून पोटदुखी व श्वसनाचा त्रास होत आहे, असे समजून सदर स्त्रीला सावंगी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र रूग्णालयात प्राथमिक तपासणी केली असता अतिवाढ झालेले ट्युमर गर्भाशयात दिसून आले. त्यात कर्करोगाची शक्यताही दिसून येत असल्याने रूग्णाची तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी पोटातून २६ किलोचा मांसल गोळा काढण्यात आला. ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सी. हरिहरन यांच्यासह डॉ. मेहुल साळवे, डॉ. कल्याणी महाजन, डॉ. रैनी अग्रवाल, डॉ. सोमराज सरकार, डॉ. शबनम, डॉ. करूणा यादव यांचा या उपचार प्रक्रियेत सहभाग होता. रूग्णाला कर्करोगाची लागण झाली नसल्याचे चाचण्यातून आढळून आल्याने रूग्णाच्या परिवारास डॉक्टरांनीही सुटकेचा श्वास सोडला.
सध्या जमिलाबी यांची प्रकृती पूर्णत: धोक्याबाहेर असून त्यांना सुटी देण्यात आल्याचे स्त्रीरोग व प्रसुती विभाग प्रमुख डॉ. दिप्ती श्रीवास्तव यांनी सांगितले.