आर्द्रतेमुळे थंडी ओसरली
By Admin | Updated: October 27, 2016 00:44 IST2016-10-27T00:44:18+5:302016-10-27T00:44:18+5:30
शरद पौर्णिमेपासून गुलाबी थंडीची चाहुल लागते. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी जाणवत होती.

आर्द्रतेमुळे थंडी ओसरली
बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम
वर्धा : शरद पौर्णिमेपासून गुलाबी थंडीची चाहुल लागते. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी जाणवत होती. किमान तापमान १८ अंशांपर्यंत खाली आले होते; पण गत आठवड्यापासून थंडी ओसरल्याचे जाणवत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, ढग तयार झाले असून थंडी कमी होऊन तापमान वाढल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
दिवाळीत पहाटे थंडीत उठून अभ्यंगस्थानाचा वेगळाच आनंद असतो. सध्या थंडी त्या प्रमाणात जाणवत नसल्याने या आनंदावर विरजण पडेल काय, असे वाटायला लागले आहे; पण हा कमी दाबाचा पट्टा थायलंड, मलेशिया दिशेने सरकला असल्याने दोन ते तीन दिवसांत थंडी जाणवेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास थंडी ओसरते. शिवाय दिवसेंदिवस थंडीचे आगमन लांबत असल्याचे दिसून येते. आॅक्टोबर महिना हा मध्य भारतात ‘आॅक्टोबर हीट’ म्हणून ओळखला जातो. यंदा पाऊस सरासरीनुसार झाल्याने थंडी चांगली पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्याची प्रचिती नवरात्रीच्या प्रारंभापासून वर्धेकरांनी घेतली. नवरात्रीच्या काळात दिवसाला उन्हाचे चटके जाणवत असले तरी सायंकाळनंतर वातावरणात सुखद गारवा पसरत होता. ही थंडीची चाहुल असल्याचे मानले गेले; पण ढगाळ वातावरणामुळे थंडी ओसरल्याचे दिसून आले.(स्थानिक प्रतिनिधी)
दोन-तीन दिवसांत जाणवणार थंडी
दोन ते तीन दिवसांत आकाश पुन्हा निरभ्र होऊन थंड जाणवायला लागेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. साधारणत: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीला सुरुवात होते; पण उत्तरेकडील वारे अद्याप विदर्भापर्यंत पोहोचले नसल्याने थंडीचा प्रकोप अजून सुरू झालेला नसल्याची माहिती कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागाचे अभ्यासक नितीन डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.