उन्हाळ्यातच होतोय वृक्षांचा कोळसा

By Admin | Updated: April 28, 2016 02:02 IST2016-04-28T02:02:05+5:302016-04-28T02:02:05+5:30

पावसाळा सुरू होताच शासनामार्फत वृक्ष लागवडीसाठी विविध कार्यक्रम आखले जातात; पण संवर्धनाची विशेष काळजी घेतली जात नाही.

Coal of trees grown in the summer | उन्हाळ्यातच होतोय वृक्षांचा कोळसा

उन्हाळ्यातच होतोय वृक्षांचा कोळसा

लाकूड चोर सक्रीय : वन विभागासह बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष
वर्धा : पावसाळा सुरू होताच शासनामार्फत वृक्ष लागवडीसाठी विविध कार्यक्रम आखले जातात; पण संवर्धनाची विशेष काळजी घेतली जात नाही. परिणामी, खर्च व्यर्थ जातो. शिवाय शासकीय विभाग लाकूड चोरांवर अंकुश लावण्यातही अपयशी ठरत आहे. यामुळे उन्हाळ्यातच मोठ-मोठ्या वृक्षांचा कोळसा होत असल्याचे दिसते. सध्या जिल्ह्यात सर्वत्र झाडांतूनच धूर निघत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
पर्यावरणाचा समतोल राखता यावा म्हणून वृक्ष लागवडीसह संवर्धन आणि वृक्षतोडीवर आळा घालण्याचे कार्य हाती घेतले जात आहे. असे असताना वृक्षतोड कमी होताना दिसत नाही. रस्त्याच्या कडेला असलेली महाकाय झाडेही लाकूड चोरांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसते. जिल्ह्यात अनेक मार्गांवरील झाडे उन्हाळ्यात पेटविली जातात. परिणामी, संपूर्ण झाड कोसळते. हे धराशाही झालेले झाड लाकूड चोर कापून नेतात. यात प्रशासनाला कुठलाही महसूल मिळत नाही आणि पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. काही झाडे धुरे पेटविल्याने जळत असल्याचे दिसते. वन व बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

अजस्त्र चिंचेचे झाड आगीच्या भक्ष्यस्थानी
सेवाग्राम : मुख्य मार्गावरील अजस्त्र चिंचेचे झाड जळाल्याने कोसळले आहे. सेवाग्राम ते हमदापूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर चिंंच, बाभूळ, आंबा आदी झाडे होती; पण गत दहा वर्षांच्या कालावधीत झाडे तोडण्याकडे शेतकरी व अन्य लोकांचा कल वाढला आहे. रस्त्याच्या दुतर्फा, बांधावरील झाडे यामुळे दिसेणासी झाली आहेत. उन्हाळ्यात धुरा पेटविण्याच्या नावाखाली मुद्दाम मोठ्या झाडांना आगी लावल्या जातात. या आगीमध्ये झाड जळून कोसळते. यानंतर ते इंधनासाठी घेऊन हातात. या प्रकारात सध्या वाढ झाली आहे.
या परिसरातून दोन नद्या, नाले व बंधारे असून ओलिताची व्यवस्था आहे. झाडांचे प्रमाण अधिक असल्याने माकडांच्या झुंडीचे आश्रय स्थान होते. यामुळे शेतकरीही कंटाळले आहेत. यातूनच झाडे तोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे बोलले जात आहे. आता सर्वत्र भकास व रखरख वातावरण असून झाडाशिवाय पर्याय राहिलेला नाही.(वार्ताहर)

Web Title: Coal of trees grown in the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.