गोठ्याला लावलेल्या आगीत शेतीपयोगी साहित्याचा कोळसा
By Admin | Updated: May 1, 2017 00:36 IST2017-05-01T00:36:16+5:302017-05-01T00:36:16+5:30
कामठी गावात महिला मंडळासह दारूबंदी केल्याने अज्ञात इसमांनी मुन्ना पाठक यांच्या गोठ्याला आग लावली.

गोठ्याला लावलेल्या आगीत शेतीपयोगी साहित्याचा कोळसा
पोलीस कारवाईत दिरंगाई : दारूबंदीमुळे काढला वचपा
झडशी : कामठी गावात महिला मंडळासह दारूबंदी केल्याने अज्ञात इसमांनी मुन्ना पाठक यांच्या गोठ्याला आग लावली. यात गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, मोटर पंप, पाईप, खते आदी साहित्य जळून खाक झाले. ही घटना २५ एप्रिल रोजी घडली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. तक्रारीनंतर पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल केला; पण अद्याप आरोपीला अटक केली नाही. यामुळे गोठा पेटविणारा आरोपी शोधून त्याला अटक करावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे.
सेलू तालुक्यातील सुरगाव नजीक कामठी हे २५-३० घरांच्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावात दारूविक्रीचे प्रमाण अधिक आहे. गावठी दारूच्या व्यवसायामुळे महिलांना त्रास होता. यामुळे महिलांनी दारूबंदी महिला मंडळ स्थापन केले. मुन्ना पाठक यांच्या पुढाकाराने महिलांनी दारूबंदी मोहीम राबविली. यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. दारूबंदीमुळे गावात शांतता निर्माण झाली; पण दारूविक्रेत्यांकडून मंडळातील महिलांचा छळ होऊ लागला. अशातच २५ एप्रिल रोजी पुढाकार घेणाऱ्या पाठक यांच्या शेतातील गोठ्याला आग लावण्यात आली. सदर घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी पाठक कुटुंबियांनी सेलू पोलीस ठाण्यात दिली. संशयीत व्यक्तींची नावेही सांगितली; पण पोलिसांनी दखल घेतली नाही. सदर घटनेतील आरोपींना पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप पाठक कुटुंबीयांनी केला आहे. १४ दिवस लोटूनही पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने असंतोष पसरला आहे. गावात अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरिष्ठांनी लक्ष देत कारवाई करावी व भरपाई द्यावी, अशी मागणी पाठक कुटुंबियांनी केली आहे.(वार्ताहर)