नऊ तासांच्या प्रयत्नाने सापडले कपडे व दगड
By Admin | Updated: October 30, 2015 02:33 IST2015-10-30T02:33:30+5:302015-10-30T02:33:30+5:30
येथील सुरेश मोहोड याची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष ठाकूर याने पुरावा नष्ट करण्याकरिता हत्येकरिता वापरलेला दगड व मृतकाचे कपडे अडगळीत ...

नऊ तासांच्या प्रयत्नाने सापडले कपडे व दगड
पुरावा नष्ट करण्याकरिता टाकले होते विहिरीत
आवी : येथील सुरेश मोहोड याची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष ठाकूर याने पुरावा नष्ट करण्याकरिता हत्येकरिता वापरलेला दगड व मृतकाचे कपडे अडगळीत असलेल्या विहिरीत टाकल्याची कुबुली दिली. यावरून पोलिसांनी या पुराव्यांचा शोध विहिरीत घेतला. कपडे व दगड काढण्याकरिता पोलिसांना संपूर्ण विहीर उपसल्यानंतर तब्बल नऊ तासांनी दगड व कपडे शोधून काढले. दरम्यान, आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारी संपल्याने त्याला दुसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले.
दसऱ्याच्या मध्यरात्री रेल्वेस्टेशन वॉर्ड, हमालपूरा येथे राहणाऱ्या सुरेश मोहोड याची त्याच्या घराजवळ राहणाऱ्या संतोष ठाकूर याने दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली. शिवाय त्याने हत्येकरिता वापरलेला दगड व मृतकाचे कपडे त्याच परिसरात असलेल्या अडगळीतील विहिरीत टाकल्याची कबुली दिली. या माहितीवरून जमादार शेखर पाटील, मारोती सिडाम, किशोर ताकसांडे व चमुने घटनास्थळ गाठून विहिरीची पाहणी केली.
संतोषने ज्या विहिरीत कपडे टाकले तिथे गळ टाकून शोधण्याचा प्रयत्न केला. दुपारी सुरू झालेला या कपड्यांचा शोध सहज न लागल्याने विहिरीत उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तोही निष्फळ ठरल्याने विहिरीतील पाणी उपसण्याचा निर्णय झाला. मोटारपंपाने पाणी उपसल्यानंतर रात्री उशिरा मृतकाचे कपडे व दगड पोलिसांच्या हाती लागला. (तालुका प्रतिनिधी)
पुरावा मिळविण्याकरिता उपसली विहीर
संतोष ठाकूर याने ज्या विहिरीत हत्येकरिता वापरलेला दगड व मृतकाचे कपडे टाकले ते काढण्याकरिता पोलिसांनी मोटारपंप लावून अख्खी विहिरच उपसून काढली. यात त्यांचा नऊ तासांचा कालावधी गेला. या विहिरीतील पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.