कोटींचे ‘क्लिअरिंग’ रखडणार!
By Admin | Updated: October 19, 2015 02:15 IST2015-10-19T02:15:18+5:302015-10-19T02:15:18+5:30
विजयादशमीसह लागून आलेल्या दोन सुट्यामुळे जिल्ह्यातील बँका पुढील आठवड्यात तीन दिवस बंद राहणार आहे.

कोटींचे ‘क्लिअरिंग’ रखडणार!
बँकिंग असुविधा : पुढील आठवड्यात बँका तीन दिवस बंद, बाजारातील अर्थचक्राला फटका
वर्धा : विजयादशमीसह लागून आलेल्या दोन सुट्यामुळे जिल्ह्यातील बँका पुढील आठवड्यात तीन दिवस बंद राहणार आहे. परिणामी वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी तथा क्षेत्रीय बँकांच्या विविध शाखांमधील उलाढाल तीन दिवस ठप्प पडणार आहे. त्यामुळे या तीन दिवसात जिल्ह्यातील कोटींचे क्लिअरिंगचे कामकाज प्रभावित होणार आहे. मात्र आॅनलाईन प्रक्रियेचा वापर ग्राहकांकडून होत असल्याने त्याचा विशेष परिणाम होणार नसल्याचे अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले आहे.
ही समस्या विचारात घेता अग्रणी बँकेने संबंधित बँकांना पुढील आठवड्यात जिल्ह्यातील एटीएममध्ये दोन वेळा रकमेचा भरणा करण्यासंदर्भात सूचित केले आहे. सण-उत्सवाच्या काळातच बँका बंद राहणार असल्याने बाजारातील अर्थचक्राला फटका बसणार आहे. आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सण-उत्सवाचा आहे. या कालावधीत नेहमीच बँकांना सलग सुट्या आल्याचा इतिहास आहे; पण यावर्षी या सलग सुट्या आल्या नसल्या तरी गुरुवारी विजयादशमी असल्याने त्या दिवशी बँका बंद राहणार आहे. २३ आॅक्टोबरला बँका सुरू राहणार असल्या तरी २४ आॅक्टोबरला चौथा शनिवार आणि २५ आॅक्टोबरला लगोलग रविवार आल्याने सर्वसामान्यांचे बँकिंग व्यवहार ठप्प पडणार आहे. सण-उत्सव काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते; परंतु या सुट्या आल्यामुळे बाजारपेठेतील अर्थचक्र प्रभावित होणार आहे. नागरिकांची एटीएमवर मदार राहणार असल्याने एटीएमवर मोठा ताण येणार आहे. परिणामी बँकांना एटीएममध्ये किमान दोन वेळा रोख रकमेचा भरणा करावा लागणार आहे. त्यानुषंगाने सध्या बँकांनी हालचाली सुरू केल्या आहे. (प्रतिनिधी)
सलग सुट्या आल्यास एका सुटीचे समायोजन
ाँकांना सलग तीन दिवस सुट्या आल्यास त्यातील एक दिवसाची सुटी ही समायोजित केली जाते. १८८१ च्या परक्राम्य लेखा अधिनियमानुसार ती समायोजित करतात. त्यामुळे बँकांना सलग तीन दिवस सुटी राहू शकत नाही. यावर्षी सुदैवाने दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी बँका सुरू राहणार असल्याने सुटी समायोजित करण्याची गरज पडलेली नाही.
प्रतिदिन १५० कोटींचे क्लिअरिंग
जल्ह्यातील राष्ट्रीयकृत व काही खासगी बँकांच्या एकूण सुमारे १०० शाखा आाहे. यातून दररोज १५० कोटी रुपयांचे रोख व धनादेशाद्वारे व्यवहार होता. बँका तीन दिवस बंद राहणार असल्याने तीन दिवसाचे सुमारे ४५० कोटी रुपयांचे क्लिअरिंंग त्यामुळे प्रभावित होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे २६ आॅक्टोबरला बँका पुन्हा सुरळीत सुरू होतील, तेव्हा नागरिकांची बँकामध्ये मोठी गर्दी होण्याचे संकेत आहेत.
सध्या आॅनलाईन व्यवहार होत आहे. यामुळे बँक बंद असल्याचा विशेष परिणाम जाणवत नाही. नागरिक त्यांचे व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करीत असतात. शिवाय मदतील एटीएम आहे. केवळ धनादेशाचे व्यवहार या सुट्यांमुळे विस्कळीत होतील. सर्वसामान्य नागरिकावर त्याचा विशेष परिणाम होणार नाही. या सुट्या सलग नसून मध्ये एक दिवस बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याने व्यवहारावर विशेष प्रभाव पडणार नाही.
- विजय जांगडा, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.