भारनियमनामुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: May 4, 2017 00:47 IST2017-05-04T00:47:16+5:302017-05-04T00:47:16+5:30
सर्कसपूर, राजापूर, कर्माबाद, निंबोली (शेंडे), नांदपूर, धनोडी, साठोडा, बेनोडा, एकलारा, अंबिकापूर, भाईपूर, हैबतपूर,

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त
वाठोडा सर्कलमधील प्रकार : ग्रामस्थ धडकले महावितरणच्या कार्यालयावर
आर्वी : सर्कसपूर, राजापूर, कर्माबाद, निंबोली (शेंडे), नांदपूर, धनोडी, साठोडा, बेनोडा, एकलारा, अंबिकापूर, भाईपूर, हैबतपूर, बाजारवाडा, खुबगाव या वाठोडा जि. प. सर्कल परिसरात महावितरणच्यावतीने चक्क १८ तासाचे भारनियमन सुरू आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी महावितरणचे कार्यालय गाठून महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन सादर केले.
निवेदनातून, सुरू असलेल्या भारनियमानामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. या भागातील विद्युत पुरवठा वेळी-अवेळी खंडीत केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन प्रभावीत झाले आहे. विद्युत पुरवठा राहत नसल्याने नळयोजनेद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा प्रभावीत झाली असून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याने लहान मुलांसह वयोवृद्ध व रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत नसतानाही या भागात महावितरणच्यावतीने वसुली नियमित सुरू असल्याचा आारोप निवेदनातून करण्यात आला आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एफ ग्रुपमध्ये या परिसराला टाकण्यात आले आहे. उत्कृष्ट वसुली असल्याने वसुलीसाठीचा पुरस्कार मिळाला असताना हा सर्कल एफ ग्रुप मध्ये कसा असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. वेळी-अवेळी सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी महावितरणच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना पंचायत समितीचे उपसभापती धर्मेंद्र राऊत, सरपंच संघटनेचे अध्यक्ष निखील कडू, प्रमोद चव्हाण, सरपंच दिनेश डेहनकर, उपसरपंच किशोर काळे, अश्विन शेंडे, अरूण चिखले, रोशन राऊत, निलेश गायकवाड, सागर ठाकरे, अफसर खान, मोहन शेंद्रे, संगीता बारसागळे, पुष्पा शेंद्रे, सुनंदा वाघाडे, अंजना नेवारे, विजय वाघाडे, विनायक बारसागळे, भानदास मुरके, गजेंद्र कोहरे, रामदास कडू आदींची उपस्थिती होती. मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना झालेल्या चर्चेदरम्यान संतप्त नागरिकांनी होत असलेल्या भारनियमनामुळे विद्युत अभावी निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला. शेवटी होत असलेल्या मागणीवर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्याने संतप्त नागरिक थोडे शांत झाले. त्यांनी मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच परिसर एफ ग्रुपमध्ये
या भागातील नागरिक विजेचे देयक नियमित अदा करतात. परिणामी, येथील सर्कलला उत्कृष्ट वसुलीचा पुरस्कारही मिळाला आहे. उत्कृष्ट वसुलीचा पुरस्कार मिळणारा परिसर एफ ग्रुपमध्ये कसा असा सतप्त सवाल या भागातील नागरिक विचारत असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच या परिसराचा एफ ग्रुपमध्ये समावेश झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.