मंगल कार्यालयाविरोधात नागरिकांचा एल्गार
By Admin | Updated: June 17, 2015 02:25 IST2015-06-17T02:25:01+5:302015-06-17T02:25:01+5:30
पिपरी (मेघे) ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये नागरी वसाहतीची मान्यता देण्यात आली आहे. असे

मंगल कार्यालयाविरोधात नागरिकांचा एल्गार
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : पिपरी (मेघे) वासीयांचे धरणे
वर्धा : पिपरी (मेघे) ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये नागरी वसाहतीची मान्यता देण्यात आली आहे. असे असताना या भागात कुठलीही व्यवसायीक परवानगी न घेत मातोश्री मंगल कार्यालय नामक इमारत बांधण्यात आली. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सदर कार्यालय बंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. या मागणीकरिता मंगळवारी एक दिवशीय धरणे देत जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले.
या ले-आऊटमध्ये सदर मंगल कार्यालयाच्या नावे कोणतीही व्यावसायिक परवानगी नसून त्यांच्याकडून येथे मुलांकरिता खेळण्यासाठी असलेल्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाय फटाक्यांचा आवाज, शिल्लक अन्नाचा त्रासही या नागरिकांना आहे.
या ले-आऊट मधील खुली जागा पार्किंगकरिता मिळावी म्हणून कार्यालयाचे संचालक काही राजकीय व्यक्तींशी हस्तांदोलन करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी नागरिकांनी निवेदनातून केला आहे. या खुल्या जागेचे सौंदर्यीकरणाचा ठराव यापूर्वीच झाल्याचे निवदेनात नमूद आहे. येथे उद्यान करण्याकरिता जिल्हा नियोजन समितीतून पाच लाख रुपये मंजुरही झाले आहे.
या मागणीकरिता येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी उपसरपंच सतीश इखार, सदस्य विद्या कळसाईत, सुनील बुरांडे, सतीश बजाईत यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
सौंदर्यीकरणाचा ठराव सात वर्षांपूर्वीच
४या ओपन स्पेस मध्ये सौंदर्यीकरण करण्याबाबत ग्रामसभेने २००८ मध्ये ठराव पारित केलेला होता, हे विशेष. याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून पाच लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. असे असताना ग्रामपंचायतीच्या ठरावा विरुध्द पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेणे उचित नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ले-आऊट निर्माण झाले त्याच वेळी मंगल कार्यालयाच्या उद्देशाने जागा घेतली होती. ले-आऊट मालकानेही त्यावेळी ओपन स्पेस असलेले दोन प्लॉट मला दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे. शिवाय मंगलकार्यालयासमोर असलेली रिकामी जागा ग्रा.पं.ला पार्किंगकरिता भाडेतत्त्वार मागत आहे. तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र येथील काही नागरिक ग्रा.पं.च्या सदस्यांशी हातमिळवणी करून राजकारण करीत आहे.
-संजय ठाकरे, संचालक, मातोश्री मंगल कार्यालय, वर्धा