नागरिकांना मिळणारा गहू निकृष्ट
By Admin | Updated: October 9, 2015 02:25 IST2015-10-09T02:25:32+5:302015-10-09T02:25:32+5:30
येथील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याच्या तक्रारीवरून आमदार समीर कुणावार यांनी बुधवारी ...

नागरिकांना मिळणारा गहू निकृष्ट
आमदारांकडून स्वस्त धान्य दुकानांची तपासणी
हिंगणघाट : येथील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याच्या तक्रारीवरून आमदार समीर कुणावार यांनी बुधवारी आकस्मिकरित्या स्वस्त धान्य दुकानामधील धान्याची तपासणी केली. याचवेळी त्यांनी शासकीय गोदामाची पाहणी केली. या गोदामात असलेला गहू निकृष्ठ असल्याचे दिसून आले. यामुळे हा गहू परत नेत चांगल्या प्रतिचा गहू देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या.
आ. कुणावार यांनी राममंदिर वॉर्ड, मातामंदिर वॉर्ड, दत्त मंदिर वॉर्ड, नन्नाशा वॉर्डातील स्वस्त धान्य दुकानात जावून स्वत: तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दीपक करांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, पुरवठा निरीक्षक टेकाडे सहभागी होते. काही ग्राहकांनी शहरातील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी स्वत: स्वस्त धान्य दुकानातील धान्याची तपासणी करून नमुने गोळा करून घटनास्थळीच पंचनामा केला. बहुतांश दुकानात काही निकृष्ठ दर्जाच्या गव्हांची पोती आढळून आली.
याबाबत दुकानमालकांना विचारणा केली असता त्यांनी शासकीय धान्य गोदामातून निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याचे सांगितले. हा गहू ग्राहकांना कदापि देता कामा नये, अशी तंबीही आ. कुणावार यांनी दिली. यानंतर आमदारांनी त्यांचा मोर्चा शासकीय धान्य गोदामाकडे वळविला. तेथे त्यांनी हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात पुरवठा होणाऱ्या गव्हाच्या पोत्याची तपासणी केली. तपासणीअंती सुमारे २० टक्के गहू हा खाण्यायोग्य नसल्याचे निदर्शनास आले. येथेही त्यांनी पंचासमक्ष पंचनामा केला. यावर तातडीने उपायोजना करण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक घेतली.
या बैठकीत स्वस्त धान्य दुकानामधून ग्राहकांनी निकृष्ठ दर्जाचा धान्यमाल घेवू नये, असे सूचना फलक लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच दुकानदारांनी सुद्धा निकृष्ठ दर्जाचा धान्यमाल गोदामामधून उचलू नये. उचल्यास तो परत करावा, अशाही सूचना त्यांनी केल्यात. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा धान्यमाल मिळावा हा हेतू या कार्यवाही मागील असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
खैरीच्या स्वस्त धान्य दुकानात
धान्य वाटपात अनियमितता
आकोली- सेलू तालुक्याच्या खैरी येथील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना डावलले जात असून असून त्यांच्या नावावर येणारे धान्य कुठे जाते याचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार धान्य दुकानांना व शासकीय गोदामांना भेटी देणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सवाई यांना मिळाली. यावरून त्यांनी थेट हिंगणघाट गाठले. आमदारांनी गोदामातील धान्याची पाहणी करताच आलेली दुर्गंधी सवाई यांना सहन झाली नसल्याने त्यांनी नाकाला रुमाल लावल्याने सारेच विचारात पडले.
ग्राहकांनी निकृष्ट धान्य घेऊ नये
परिसरातील ग्राहकांनी निकृष्ठ दर्जाचा धान्यमाल घेवू नये, या आशयाचे फलक प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात लावण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
परिसरात खळबळ
आ. कुणावर यांनी शहरातील धान्य दुकानाची अचानक तपासणी केल्याने दुकान मालकांची चांगलीच तारांबळ उडाली.