गुन्ह्यांच्या तपासामध्ये नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे
By Admin | Updated: July 12, 2014 01:39 IST2014-07-12T01:39:58+5:302014-07-12T01:39:58+5:30
कुठल्याही गुन्ह्यांच्या तपासामध्ये नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तपासामध्ये नागरिकांनी पोलिसांना योग्य सहकार्य केल्यास...

गुन्ह्यांच्या तपासामध्ये नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे
तळेगाव (श्या़पंत) : कुठल्याही गुन्ह्यांच्या तपासामध्ये नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तपासामध्ये नागरिकांनी पोलिसांना योग्य सहकार्य केल्यास गुन्ह्यांचा तपास लवकर लागून आरोपींना गजाआड करता येते. असे मत आर्वीचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बुरडे यांनी व्यक्त केले.
तळेगाव पोलीस स्टेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ३९ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या या पोलीस ठाण्यात एकूण ३८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ठाण्यात आष्टी व कारंजा तालुक्यातील १० तर आर्वी तालुक्यातील नऊ गावांचा समावेश आहे. या कारणाने असलेला कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्यांची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सी.सी.टी.व्ही. कॅमेरे या कामात उपयुक्त ठरत आहेत. व्यावसयिकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये तसेच मंदिर परिसरामध्ये या कॅमेऱ्यांचा उपयोग करावा असे ते म्हणाले. टोलनाक्यावरील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महामार्गावरील होणारी लुटपाट तसेच अन्य गुन्ह्यांच्या तपासात मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित परिसरातील गावांमधील पोलीस पाटील तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष, सदस्य, सरपंच यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. पोलिसांवर कामाचा ताण असतो. तीही माणसच आहेत. तेव्हा त्यांची मानसिकता समजावून घ्यावी, आपसी सामंजस्यातून आणि सामाजिक भावनेतून विचार करुन गावातील छोटे-मोठे भांडण पोलिसांच्या व तंटामुक्तीच्या माध्यमातून सोडवावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना व पोलीस पाटलांना केले.
प्रास्ताविक व संचालन ठाणेदार दिनेश झामरे यांनी केले. सध्याचे पोलीस स्टेशन हे सा. बां. विभागाच्या भाड्याच्या जागेत आहे. नवीन जागा आणि बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन हे काम लवकर मार्गी लावावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.(वार्ताहर)