‘नगर रचने’च्या संथ कामाने नागरिक त्रस्त
By Admin | Updated: November 19, 2015 02:50 IST2015-11-19T02:50:56+5:302015-11-19T02:50:56+5:30
शासनाने शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींमधील बांधकामावरील बंदी उठवत त्यासाठी अन्य विभागांप्रमाणेच नगर रचनाकार विभागाची परवानगी आवश्यक केली आहे.

‘नगर रचने’च्या संथ कामाने नागरिक त्रस्त
एकाच कामासाठी वारंवार चकरा : प्रत्येक वेळेस काढल्या जातात वेगवेगळ्या त्रुटी
वर्धा : शासनाने शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींमधील बांधकामावरील बंदी उठवत त्यासाठी अन्य विभागांप्रमाणेच नगर रचनाकार विभागाची परवानगी आवश्यक केली आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. येथील कर्मचारी एकाचवेळी कागदपत्रांमधील त्रूटी न सांगता वारंवार त्या सांगून कार्यालयाच्या चकरा मारायला लावत असल्याचा आरोप नागरिकांद्वारे केला जात आहे. कामाचे स्वरूप सोपे करून नागरिकांना होत असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी होत आहे.
अनेक दिवस लोटूनही कामे पूर्ण होत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना वारंवार येत आहे. कर्मचाऱ्यांच्या बेफीकीर व सावकाश काम करण्याच्या पद्धतीने वारंवार उंबरठे झिजवूनही बांधकामाची प्रकरणे निकाली निघत नाहीत. बांधकाम परवानगीसह भूखंड विभाजनाची विविध प्रकरणे या कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती आहे. अकरा ग्रामपंचायतीमध्ये परवानगी मिळत नसल्यामुळे अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अर्धवट होते. या बंदीमुळे अनेकांनी परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकामे केली; पण आता बांधकामाला शासनाने परवानगी दिल्यानंतर कायदेशीर मार्गाने बांधकाम करण्यासाठी नगर रचनाकार विभागाकडे अनेकांनी अर्ज दाखल केले. सदर अर्जदारांना परवानगी मिळविण्यासाठी नगर रचनाकार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. नगर रचनाकार विभागाच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांना बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.
अनेकांनी ग्रामपंचायतीमार्फत नगर रचनाकार विभागाकडे अर्ज सादर केलेत; पण त्रूटी काढून प्रकरणे परत पाठविण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच आहे. महिनाभराच्या कालावधीत घरांच्या बांधकामाची परवानगी प्रकरणे निकाली काढणे आवश्यक आहे. असे असतानाही महिना लोटूनही बांधकाम परवानगीची प्रकरणे निकाली निघत नाही. परिणामी, सर्वसामान्यांची अडचण होत आहे. बांधकाम करताना एका सातबाऱ्यावर दोघांचे नाव असल्यास भूखंडाचे विभाजन करावे लागते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयातून ग्रामपंचायत, तलाठी आणि नगर रचनाकार विभागाला पत्र पाठवून अहवाल मागितला जातो. तशी प्रक्रियाही काहींनी केली; पण ठराविक वेळेत अहवाल दिल्यानंतरही नगर रचनाकार विभागात अहवालासाठीही टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्यांना परवानगीसाठी एवढी चालढकल करीत त्रास का दिला जातो, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. प्रत्येकवेळी वेगळे कारण समोर करून परवानगी देण्यास चालढकल केली जात असल्याने या विभागाच्या कामकाजाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांद्वारे होऊ लागली आहे.(शहर प्रतिनिधी)
रिक्त पदांमुळे कामात येतात अडचणी
नगर रचना कार्यालयात रिक्त पदांचा अनुशेष असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन ते चार पदे येथे रिक्त आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या कामावर होत असून एकाच कामासाठी नागरिकांना महिनाभरात वारंवार चकरा माराव्या लागत आहे. तरीही त्यांची कामे पूर्ण व्हायला तयार नाही. त्यामुळे संतापलेले नागरिक आणखी काय हवय असा प्रतिप्रश्न करीत असतात. कामाचा व्याप वाढत असला तरी या कार्यालयात कर्मचारी पुरेसे नाहीत. परिणामी कामाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे आधी पदांचा भरणा करावा अशी मागणीही होत आहे.