काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपमय
By Admin | Updated: February 24, 2017 02:08 IST2017-02-24T02:08:52+5:302017-02-24T02:08:52+5:30
अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने तब्बल ३१ जागांवर विजय संपादन करुन काँग्रेसच्या बालेकिला ‘भगवा’ केला आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपमय
जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांची घसरण, तर सेनेला बढती आणि बसपाची एन्ट्री
वर्धा : अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने तब्बल ३१ जागांवर विजय संपादन करुन काँग्रेसच्या बालेकिला ‘भगवा’ केला आहे. काँग्रेसची तीन जागांनी पिछेहाट झाली असून १३ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ दोन जागांवरच स्थिरावली. शिवसेनेने दोन जागा बळकावत आपले अस्तित्व कायम राखले, तर बसपाने दोन जागांसह जोरदार मुंसडी मारली. एका जागेवर रिपाइंने खाते उघडले.
नगर पालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तामिल समजली जाते. या दोन्ही निवडणुकीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मतांचा कौल लक्षात येतो. या निवडणुकीत भाजपाने सर्वच राजकीय विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. ही निवडणूक भाजपचीसाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन घेऊन आली तर काँग्रेसला धोक्याची घंटा देणारी ठरली.
अध्यक्षपदाचा मान हिंगणघाटला?
भाजपाने जिल्हा परिषदेवर बहुमत प्राप्त केले असले तरी सर्वाधिक विक्रमी नऊ जागा हिंगणघाट विधानसभा मतदार संघात जिंकल्या आहेत. या विजयाचे श्रेय आ. समीर कुणावार यांना जाते. याच अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षपदावर हिंगणघाट तालुक्याचा दावा मजबूत असल्याची चर्चा भाजप गोटात सुरू झालेली आहे. जिल्हाध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली(वाघ)गट याच प्रवर्गासाठी राखीव होता. या गटातून भाजपाचे उमेदवार नितीन रामचंद्र मडावी हे विजयी झाले असून भाजपश्रेष्ठी त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.