मंदिराच्या बांधकामामुळे शाळेच्या प्रांगणावर गंडांतर
By Admin | Updated: March 23, 2015 01:52 IST2015-03-23T01:52:24+5:302015-03-23T01:52:24+5:30
स्थानिक विठ्ठल-रूख्मिणी मंदिराच्या जागेत सुरू असलेली शाळा सध्या अडचणीत आली़ तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त झाल्याने मंदिर व सभागृहाचे बांधकाम सुरू आहे़ ...

मंदिराच्या बांधकामामुळे शाळेच्या प्रांगणावर गंडांतर
रसुलाबाद : स्थानिक विठ्ठल-रूख्मिणी मंदिराच्या जागेत सुरू असलेली शाळा सध्या अडचणीत आली़ तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त झाल्याने मंदिर व सभागृहाचे बांधकाम सुरू आहे़ यामुळे शाळेच्या प्रांगणावरच गंडांतर आले आहे़ या प्रकरणी मंदिर व शाळा प्रशासनाने आपसात चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे झाले आहे़
मंदिराचे माजी अध्यक्ष दिवंगत चंपत वानखडे यांनी शिक्षणाचा अभाव लक्षात घेत मंदिर इमारतीचा मागील भाग ३० वर्षांपूर्वी रविंद्रनाथ टागोर शिक्षण संस्थेला दिला़ तेथे सावित्रीबाई फुले विद्यालय सुरू आहे़ शाळेकडे स्वत:ची इमारत, शौचालय नाही़ गावात अन्य ठिकाणी शाळेची इमारत व्हावी म्हणून दोन दानशूर ग्रामस्थांनी स्वत:ची शेती संस्थेला दान केली़ त्याची तलाठी रेकॉर्डला नोंद आहे; पण संस्थेने अद्याप इमारत बांधलीच नाही़ मंदिराला तिर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त झाला़ यामुळे २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला़ यातून मंदिर सभागृहाचे बांधकाम केले जात आहे़ गावात सभागृह नसल्याने नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते़ यात गरिबांचे हाल होतात़ ही बाब लक्षात घेऊन तसेच मंदिरातील कार्यक्रम व उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मंदिर कमेटी व विद्यमान अध्यक्ष अॅड़ रवींद्र वानखडे यांनी हा निर्णय घेतला़ १५ दिवसांपूर्वी गजानन कन्स्ट्रक्शन पुलगावच्या अधिपत्यात ग्रामस्थ व कार्यकर्ते विलास सावरकर यांच्या देखरेखीत बांधकाम सुरू झाले़ यामुळे शाळेला प्रांगण राहिले नाही़
आधीच सुविधांचा अभाव व आता प्रांगणावरच बांधकाम होत असल्याने प्रार्थना कुठे घ्यायची, मुले कुठे खेळणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे़ मंदिर कमेटीने जीर्ण खोल्यांची माहिती शाळा प्रशासनास दिली; पण व्यवस्था केली नाही़ हा तिढा सोडविण्यासाठी मंदिर कमेटी व शाळा प्रशासनाने आपसात चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़(वार्ताहर)