चौफेर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2015 02:17 IST2015-08-14T02:17:18+5:302015-08-14T02:17:18+5:30

जिल्ह्यात सुरू असलेली पावसाची संततधार गुरूवारी दुपारपर्यंत सुरूच होती. सकाळी जिल्ह्यातील आठही तालुक्यात १३१.८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Chuphar Santhadhar | चौफेर संततधार

चौफेर संततधार

पाच मार्गांवरील वाहतूक ठप्प : खैरी येथील शाळा बंद; धरणातून पाण्याचा विसर्ग कायमच
वर्धा : जिल्ह्यात सुरू असलेली पावसाची संततधार गुरूवारी दुपारपर्यंत सुरूच होती. सकाळी जिल्ह्यातील आठही तालुक्यात १३१.८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सकाळपासून निम्न वर्धाची ३१ दारे पुन्हा उघडण्यात आली आहेत. अप्पर वर्धा धरणाची १३ दारे ८० सेमीने उघडण्यात आली. यातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे येथील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पाण्यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यात आणखी पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या पाण्यामुळे काही छोट्या नाल्यांचे पाणी परत येत असल्याने बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. आर्वी - वर्धा मार्गावरील मजरा येथील नाल्याला गत तीन दिवसांपासून सतत पाणी आहे. या पाण्यातून मोठी वाहने काढणे शक्य होत असली तरी लहान वाहनांची वाहतूक ठप्प आहे.
याच भागातील खैरी गावाचा संपर्कही गत दोन दिवसांपासून तुटला असून येथील शाळा दोन दिवसांपासून उघडली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असून गावकऱ्यांना गावाच्या बाहेर येणे जाणे कठीण झाले आहे. येथील रुग्णही गावातच आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून शासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी आहे.
बुधवारी आलेल्या पावसामुळे देवळी तालुक्यातील बाभुळगाव (खोसे) येथील मुरलीधर टावरी यांच्या मालकीच्या दोन गायी बेपत्ता होत्या. त्यांचे मृतदेह आज आढळून आले. या प्रकराची माहिती तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी पंचनामा केला. या शेतकऱ्याला २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली.
सततच्या पावसाने नदी नाल्यांना पूर आल्याने हिंगणघाट-सिर्सी, वर्धा-गोजी, देवळी-साटोड, वर्धमनेरी, मजरा या गावाचे मार्ग बंद झाले आहे. या गावातील बसफेऱ्याही रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्यावतीने दिली आहे. सतत आलेल्या या पावसामुळे देवळी तालुक्यातील पुलगाव येथील एक घर पडल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. यात एक इसम जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. आकोली येथील मनोहर गोमासे यांच्या तर वायगाव (निपाणी) येथील शांताबाई कवडू भोरे यांच्या घराची भिंत कोसळली. यात त्यांचे नूुकसान झाले. दोन्ही घटनेत पंचनामा करण्यात आला.
निम्न वर्धाचे सर्व ३१ दरवाजे दुसऱ्यांदा उघडले
गुरुवारी सकाळपासून आर्वी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील बाकळी, वर्धा, आड नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे गुरुवारी दुसऱ्यांदा उघडले आहे. या सर्व दारांतून ४० से.मी. ने ५७० क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. गत आठवड्यात या निम्न वर्धाची दारे १० से.मी. ने उघडण्यात आली होती. लगेच दुसऱ्याच आठवड्यात या डॅमचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आल्याने तालुक्यातील बाकळी, आडनदी, वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाची संततधार अशीच सुरू तालुक्यात दुसऱ्यांदा पूरसदृष्य स्थिती निर्माण होणार असल्याचे एकूण चित्र आहे.
चार दिवसांपासून खैरीची शाळा बंद
सोमवार रात्रीपासून पुलावर पाणी वाहत आहे. ते आजही सुरूच आहे. सततच्या पाऊस सरींमुळे जलस्तर वाढीवर आहे. यामुळे येथील शाळा बंद आहे. याची माहिती मात्र येथील शिक्षकांनी शिक्षण विभागापासून दडवून ठेवली असल्याचे समोर आले आहे.
सततच्या पावसामुळे सेलू येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती लागल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
जलाशयातून पाण्याचा विसर्ग
धाम प्रकल्पातून ६२ सेमी उंचीवरून सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू असून २१४.४९ क्युमेक्सने पाणी सुरू आहे. पंचधारा प्रकल्पातून १५ सेमी उंचीवरून १२.७० क्युमेक्सने तर मदन उन्नई धरण १५ सेमीने १६.२० क्युमेक्सने, वर्धा कार नदी प्रकल्प ५२ सेमीने १३९.९५ क्युमेक्स आणि सुकळी लघु प्रकल्पातून १४ सेमीने २४.४४ क्युमेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्यात गत महिन्यात दडी मारलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यात दमदार वापसी केली. जिल्ह्यात आतापर्यंत ५,२५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर या पावसामुळे पातळी घसरलेल्या धरणांची पातळीही बऱ्यापैकी वाढली असल्याचे दिसून आले आहे. यातून विसर्गही सुरू आहे.

Web Title: Chuphar Santhadhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.