भविष्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडा
By Admin | Updated: June 22, 2014 00:06 IST2014-06-22T00:06:12+5:302014-06-22T00:06:12+5:30
दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला

भविष्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडा
एज्यूकेशन व करिअर फेअरला प्रारंभ : संजय भागवत यांचे प्रतिपादन
वर्धा : दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला कुठे जायचे आहे, हे आधी ठरवा आणि नंतर आपल्या अभ्यासक्रमाची निवड करा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात तीन दिवसीय एज्यूकेशन व करिअर फेअरचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म़ गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र तर अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पीआरएसआयचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय, प्रदीप दाते आदी उपस्थित होते़
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसेच करिअर निवडीबाबत एज्यूकेशन व करिअर फेअरच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भागवत यांनी केले़ रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून यासाठी क्षमतावृद्धीसारखे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत विशेष कार्यक्रम तयार केला आहे़ यात औद्योगिक समुहांना आवश्यक असणारे दीड हजार क्षमतावृद्धी संदर्भातील विषय निश्चित केले आहे. यामुळे भविष्याचा वेध घेऊन आपला अभ्यासक्रम ठरवावा, असेही भागवत यांनी सांगितले.
कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध पर्याय उपलब्ध असून रोजगार व स्वयंरोजगार सुरू करण्याची संधीसुद्धा उपलब्ध आहे. नवनवीन संधीची माहिती घेऊन त्यास अनुषंगिक अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमाच्या माध्यमाचा लाभ घ्यावा. जनसंपर्क ईव्हेंट मॅनेजमेंट यासारखे नवीन दालने विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असून शिक्षण व रोजगार याचा समन्वय ठेवून अभ्यासक्रमाची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी पब्लिक रिलेशन सोसायटी आॅफ इंडियाचे वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय यांनी एज्यूकेशन व करिअर फेअरच्या आयोजनाबाबत माहिती दिली. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला़ प्रास्ताविक पीआरएसआयच्या वर्धा शाखेचे सचिव बी.एस. मिरगे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष प्रा. प्रफूल्ल दाते यांनी मानले. शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील सेतू बांधण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून होत असून वर्धा जिल्ह्यात सर्वच शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने हा जिल्हा एज्यूकेशन हब म्हणून ओळखला जात आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)