चिटफंड कंपनीतील गुंतवणूकदार आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:23 IST2018-02-07T23:22:22+5:302018-02-07T23:23:39+5:30
चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्यात आले.

चिटफंड कंपनीतील गुंतवणूकदार आंदोलनाच्या तयारीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीचे आयोजन जनलोक प्रतिष्ठान संघटना कृती समिती नागपूर, वर्धा, सेलू, हिंंगणघाट यांच्यावतीने करण्यात आले होते.
सेबी या सरकारी कंपनीने देशातील लाखो कंपन्यांना अडचणीत आणून त्यांना बंद पाडले. त्यामुळे करोडो गरीब सामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसला आहे. कंपन्यामध्ये पूर्णवेळ काम करणारे सध्या बेरोजगार झाले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. करोडो जनतेचे मोलमजुरीचे पैसे परत करण्यास सेबी टाळाटाळ करीत आहे. आजपावेतो लाखो कंपन्या बंद पाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या संपत्ती हस्तगत करण्यात आली; पण गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाही, असे बैठकीदरम्यान सांगण्यात आले. गेल्या चार वर्षापासून पर्ल्स पीएसीएल, पॅन कार्ड क्लब, मैत्र्येय आदी कंपन्याच्या गुंतवणुकदारांनी जिल्हाधिकारी तसेच खासदार, आमदार यांना निवेदन देत योग्य कार्यवाही करण्यासाठी विनंती केली. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०१८ ला सेबी भवन मुंबई येथे देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी ज.प्र. संघटना नागपूर कृती समितीचे उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, सचिव संतुलाल भारती, ढोमणे, सुनील सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.