दीपावलीमध्ये ‘चायना मेड’ हद्दपार
By Admin | Updated: October 27, 2016 00:43 IST2016-10-27T00:43:17+5:302016-10-27T00:43:17+5:30
दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणासाठी नागरिक आसुसलेले असतात.

दीपावलीमध्ये ‘चायना मेड’ हद्दपार
नागरिकांमधील जागृतीचा परिपाक : सजावटीच्या आकर्षक वस्तूंनी सजली बाजारपेठ
वर्धा : दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणासाठी नागरिक आसुसलेले असतात. घरांची डेंटींग-पेंटींग, सजावट यासाठी वर्षातून एकदा दिवाळीला खरेदी केली जाते. विविध वस्तूंची खरेदी, रोषणाईसाठी दिवे आदी सर्व वस्तूंची खरेदी केली जाते. दरवर्षी बाजारात चिनी वस्तूंवरच अधिक भर दिसतो; पण यंदा देशात घडत असलेल्या घडामोडी आणि शासनाचे आवाहन लक्षात घेत बाजारातून ‘चायना मेड’ हद्दपार झाल्याचेच दिसून येत आहे.
दिवाळी सणासाठी सध्या बाजार सजला आहे. विविध आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध करून ग्राहकांची मागणीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी झालर, प्लास्टीक व अन्य वस्तूपासून तयार आकर्षक घंटी, तोरणे बाजारात अवतरली आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळते. दिवाळी सणासाठी पणत्यांनी बाजार सजला आहे.
गत काही वर्षांपासून बाजारपेठेतील प्रत्येक वस्तूंमध्ये ‘चायना मेड’चा शिरकाव झाला होता. यावर्षी मात्र देशपातळीवरील घडामोडींमुळे चिनी वस्तूंचा प्रभाव कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आकाश कंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तूंमध्ये चिनी शिरकाव होता; पण यंदा नागपूर, मुंबई यासह देशातील अन्य भागात तयार वस्तूंची भरमार असल्याचे दिसून येते. दुकानदारांनीही यंदा शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत चायना मेड वस्तू विकण्यापासून फारकत घेतल्याचे फेरफटका मारला असता दिसून आले.
यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही चायना मेड ला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. केवळ मोबाईल सोडले तर अन्य वस्तूंमध्ये ‘मेड इन इंडिया’ला प्राधान्य दिले जात असल्याचेच दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरीजमध्येही चायना मेडला हद्दपार करण्यात आले आहे. बहुतांश इलेक्ट्रीशीयन, कारागिर व दुकानदारांनी भारतात तयार झालेल्या सिरीज, विविध प्रकारचे दिवे वापरावर भर दिल्याचे दिसून येत आहे. काही इलेक्ट्रीशियनकडून इमारतींची रोषणाई करण्याचे कंत्राटं घेतले जातात. यासाठीही त्यांच्याकडून भारतीय सिरीज, दिव्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मोबाईल सोडून अन्य वस्तूंमध्ये चायना मेड हद्दपार झाल्याने आता नागरिकांनी भारतीय वा चिनी सोडून अन्य देशांच्या मोबाईलचा विचार करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची भिस्त सोयाबीनवर, भाव पाडल्याचा आरोप
दिवाळी हा महत्त्वाचा सण असला तरी महागाई वाढली आहे. यात शेतकऱ्यांचा टिकाव लागत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनची काढणी, मळणी केली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी सोयाबीनवरच भिस्त असल्याने लगबग सुरू आहे. दिवाळी सण साजरा व्हावा, ही अगतिकता शेतकऱ्यांची आहे. यामुळे मिळेल त्या भावात विकावे लागत आहे. व्यापाऱ्यांकडूनही याचाच फायदा घेतला जात असून हमीदरापेक्षा कमी भावात सोयाबीनची बोली लावली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.