चिमुकल्यांचा किलबिलाटाने शाळा गजबजल्या

By Admin | Updated: June 27, 2015 02:41 IST2015-06-27T02:41:15+5:302015-06-27T02:41:15+5:30

दीड ते दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या शाळा आज पुन्हा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या.

Chimukya's twitter blogs made the school gully | चिमुकल्यांचा किलबिलाटाने शाळा गजबजल्या

चिमुकल्यांचा किलबिलाटाने शाळा गजबजल्या

वर्धा : नवीन दप्तर...नवी पुस्तके... नवा कंपास घेऊन जुन्याच मित्रांना शाळेत नव्या सत्रात भेटण्याचा दिवस शुक्रवारी उजळला. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या शाळा आज पुन्हा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या. विद्यार्थ्यांमुळे मैदानेही पुन्हा खेळती झाली.
शासनाच्या निर्देशानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यात गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय पोषण आहारात पहिल्या दिवशी मिष्ठान्न देण्यात आले. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या.
शाळेच्या परीक्षा आटोपताच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्यांचे वेध लागतात. सुट्यांचा आनंद झाल्यानंतर मुलांना पुन्हा शाळेची ओढ सुरू होते. वर्गमित्र केव्हा भेटणार अशी आस त्यांना लागते. शाळेचे मैदान त्यांना खुणावते. त्यांच्या या प्रतीक्षेचा गोड शेवट झाला आणि शाळेचा पहिला दिवस उजळला. शाळेत जाण्याची लगबग सकाळपासूनच सुरू झाली. माझा गणवेश कुठे आहे. माझे दप्तर कुठे आहे, असे म्हणत सकाळी घरी अनेकांचा कल्लोळ सुरू झाला. सकाळी ११ वाजता शाळेत शिरताच काही जुने तर काही नवे मित्र त्यांना मिळाले. आणि रंगल्या जुन्या गोष्टी.
शाळेत जाताच वर्गखोली, त्यातील बेंच डेस्क याच्याशी जुळलेल्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. गतवर्षी याच बेंच डेस्कवर बसून केलेल्या खोड्या, वर्गाला मारलेल्या दांड्या, कधी शिक्षकाची काढलेली छेड आठवताच हसणे टाळणे कठीण झाले. त्या गमती आपल्या वर्गमित्र मैत्रीणीसोबत वाटण्याचा आनंद शाळा सुटल्यानंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत असल्याचे चित्र होते. (शहर प्रतिनिधी)
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासह सामाजिक न्यायदिन साजरा करण्यात आला.
‘व्हॉट्स अ‍ॅप’ही मागे नाही
हल्ली व्हॉट्स अ‍ॅप वर प्रत्येकच दिवस साजरा होत असतो. त्यामुळे नूतन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा या मथळ्याखाली शाळेचा पहिला दिवसही जल्लोषात साजरा झाला. जो तो आपल्या मुलांचे, भावाबहिणीचे शालेय गणवेशातील छायाचित्र अपलोड करीत होते.
प्रवेशद्वाराजवळ रडण्याचा आवाज
ज्यांचा खरच शाळेचा पहिला दिवस होता त्यांच्या डोळ्यात आईपासून दुरावण्याचे अश्रू दिसत होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रडण्याचा आवाज शाळेच्या आवारात पसरत होता. असे असतानाही त्यांना पालकांना शाळेत सोडून काढता पाय घेतल्याचे चित्र होते; मात्र शाळा सुटण्याच्यावेळी आपल्या मुलाला भेटण्याकरिता आणि त्याला घरी नेण्याकरिता पालकही आतूर असल्याचे चित्र शाळांच्या आवारात दिसत होते.

Web Title: Chimukya's twitter blogs made the school gully